राक्षस आणि राजू

कथा,रमेश तांबे

राजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या. शिवाय भुताखेताच्या गोष्टी वाचतानाही तो अगदी देहभान विसरून जायचा. एके दिवशी तो एक पुस्तक वाचत बसला होता. ते पुस्तक होतं राजपुत्र आणि अगडबंब राक्षस यांचं! बराच वेळ झाला होता. राजू पुस्तक वाचता वाचता अगदी मंत्रमुग्ध झाला होता. गोष्टीतल्या राक्षसाने त्या गरीब राजपुत्राला दरडावून सांगितले, “राजपुत्रा गपगुमान माझ्या मागून चालत ये; नाही तर इथल्या इथेच तुझा निकाल लावतो. राक्षसाची धमकी ऐकून राजपुत्र खूपच घाबरला. त्याचे हातपाय थरथरू लागले. भीतीने त्याचा चेहरा पांढराफटक पडला. तो रडू लागला, मदतीसाठी हाका मारू लागला. पण कोणीच त्याच्याजवळ नव्हते, ना सैनिक ना सेनापती! त्यामुळे शेवटी राजपुत्राने विचार केला इथून पळूनही जाता येणार नाही. आता राक्षस जिथे नेईल तिथेच जावं लागेल असं म्हणत राजपुत्र राक्षसाच्या मागे निघाला. आता आपणच संकटात सापडलेल्या त्या बिचाऱ्या राजपुत्राला मदत केली पाहिजे असे राजूला वाटू लागले. मग राजूदेखील हातातले पुस्तक बंद करून मोठ्या हिमतीने घराच्या बाहेर पडला. आता पुढे राक्षस त्याच्या मागे राजपुत्र आणि त्याच्या मागे राजू! राजपुत्राचे पुढे काय होणार हे बघण्यासाठी राजू त्याच्या मागून चालत होता.


चालता चालता राक्षस एका डोंगराजवळ आला. त्याने राजपुत्राला एका झाडाला बांधले आणि तो समोरच्या गुहेत गेला. राजपुत्र सुटण्याचा प्रयत्न करत होता. मोठमोठ्याने रडत होता, ओरडत होता. पण बांधलेली दोरी सोडवणं त्याला जमत नव्हतं. धावत जाऊन त्याची दोरी सोडावी अन् राजपुत्राला मोकळं करावं असं राजूच्या मनात येत होतं. पण त्याची हिंमत होत नव्हती. कारण नेमका त्याचवेळी राक्षस बाहेर आला तर या विचाराने राजू क्षणभर गप्प बसला. पण राजपुत्राची धडपड, त्याचा केविलवाणा चेहरा राजूला बघवेना. मग राजू धावतच त्या झाडाजवळ गेला त्याने दोरी सोडून झटपट राजपुत्राला मोकळे केले आणि तेथून पळून जाण्यास सांगितले. राजपुत्रदेखील लगेच गायब झाला. पण राजू मात्र तिथेच थांबला. राक्षस आपल्याला पकडेल अशी शंकादेखील राजूला आली नाही. तितक्यात राक्षस गुहेबाहेर आला. त्याने पाहिलं अरे राजपुत्र तर जागेवर नाही. याचा अर्थ याच मुलाने राजपुत्राला मदत केली असणार. मग काय आता राक्षसाने राजूलाच झाडाला बांधून ठेवले.


मग गुहेतून राक्षसाची छोटी-छोटी मुले बाहेर पडली. त्यांची नजर राजूवर पडली तशी मुले ओरडली बाबा बाबा तो बघा बाहुला ! तो हवाय आम्हाला; आमच्या सोबत खेळायला. ती आडदांड राक्षस मुलं बघून राजू खूपच घाबरला. राजू ओरडत म्हणाला, मी राजपुत्र नाही, राजू आहे राजू ! पण राजू काय बोलतो हे कोणालाच ऐकू गेले नाही. कारण राजूच्या तोंडातून आवाजाच फुटत नव्हता. राक्षसाने राजूला झाडाला करकचून बांधले. अन् पोरांना म्हणाला, “पोरांनो हा घ्या बाहुला तुमच्यासाठी, अन् करा मजा त्याच्यासोबत!”


मग काय राक्षसाची पोरं राजूच्या भोवती गोल गोल फिरू लागली. त्याला चापट्या, टपल्या मारू लागली. त्याच्या खोड्या काढू लागली. राजू ओरडला, रडला की राक्षसाची मुलं टाळ्या वाजवायची. राजूला वाटलं आपण त्या राजपुत्राला मदत करायला गेलो आणि आपणच फसलो. आता काय करायचं? तेवढ्यात राक्षसाचा एक मुलगा म्हणाला, “बाबा बाबा या बाहुल्याचे केस मला अजिबात आवडले नाहीत; ते काढून टाका ना!” मग काय राक्षसाने वस्तरा आणला आणि खराखरा राजूचे केस कापून टाकले. आता टकल्या राजूभोवती तर पोरांनी उच्छाद मांडला. त्यांनी त्रास देऊन देऊन राजूला हैराण केले. नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त राजू आता काही करू शकत नव्हता. तेवढ्यात एका राक्षस पोराने त्याच्या तोंडातून बाहेर आलेला दात राजूच्या पाठीवर टेकवला आणि तो जोरात दाबू लागला. जसा तो दात राजूच्या पाठीत घुसला तसा राजू कळवळत ओरडला, “आई गं, मेलो मेलो”
तोच राजूची आई धावत आली आणि राजूच्या डोक्यात टपली मारून म्हणाली, “काय रे काय झालं; घाबरलास का एवढा?” तोच राजू भानावर आला आणि आपण राक्षसाच्या तावडीत नाही हे पाहून राजूचा जीव भांड्यात पडला.

Comments
Add Comment

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा शब्दांवर साऱ्यांची मालकी तीन अक्षरी शब्दांची ही ‘की’ची करामत बोलकी दाराची बहीण कोण तिला

संधिप्रकाश कसा पडतो?

सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका

चांगले तेवढे घ्यावे

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर  ‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

नाटकवेडा माणूस!

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ माझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका

शारदाश्रम विद्यामंदिर

तांत्रिक विद्यालय व शास्त्र - व्यावसायिक आिण उच्च माध्यमिक - व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय SHARADASHRAM VIDYAMANDIR Technical High School &

स्वतःला प्राधान्य द्या...

मनस्वीनी,पूर्णिमा शिंदे  स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या