नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. केंद्राने २०२६ साठी पाच जणांना पद्मविभूषण, तेरा जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन या दोघांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याची घोषणा झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. टी. थॉमस, व्हायोलिन वादक एन. राजम, कम्युनिस्ट नेते पी. नारायणन यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. धर्मेंद्र आणि एन. राजम वगळता उर्वरित तीन पद्मविभूषण विजेते हे केरळशी संबंधित आहेत. यामुळे केरळ विधानसभा निवडणूक आणि पुरस्कार यांचे कनेक्शन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गायिका अलका याज्ञिक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, अभिनेता मामुट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, अॅडगुरु पियुष पांडे (मरणोत्तर), एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर.गणेश, बँकर उदय कोटक, भाजप नेते व्ही.के. मल्होत्रा (मरणोत्तर), वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन (मरणोत्तर) या तेरा जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ११३ जणांना केंद्राने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.
Padma Awards 2026_India by prahaarseo
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर महाराष्ट्रातील लोककलावंत रघुवीर खेडकर, रक्तपेढीसाठी योगदाने देणारे अर्मिडा फर्नांडिस, कृषीतज्ज्ञ श्रीरंग लाड आणि पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कोश्यारी यांच्याच काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी शपथ घेतली आणि राज्यात जेमतेम तीन दिवसांसाठी सरकार स्थापन केले होते. कोश्यारी असतानाच्या काळातच शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची यावरून राजकीय वादांना तोंड फुटले होते. विशेष म्हणजे कोश्यारी हे राज्यातले पहिलेच राज्यपाल होते जे हेलिकॉप्टर ऐवजी पायऱ्यांवरून चालत रायगडावर गेले होते. कोश्यारींची काही वक्तव्ये आणि राज्यपाल म्हणून घेतलेले तसेच न घेतलेले हे देशभर चर्चेचा विषय झाले होते. यामुळे त्यांना पुरस्कार जाहीर होताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.






