Sunday, January 25, 2026

माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’

माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’
संवाद,गुरुनाथ तेंडुलकर

डोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड पदभ्रमंती आयोजित केली आहे असं समजलं. आतापर्यंत नुसतं ऐकलं होतं, पण कधीच कुठला ट्रेक असा केला नव्हता. पण आमचे कुटुंब मित्र सागर ओक आणि त्यांचा मुलगा अभिजित जाणार असं समजलं. मन द्विधा होतं कारण वय अडूसष्ट आणि अनुभव काहीच नाही. ऑनलाइन माहिती वाचली तर जरा कठीण वाटलं. माझ्या मुलाने तर साफ विरोध केला कारण त्याने हा ट्रेक केला होता. पण मी त्यात सहभागी होण्याचं ठरवलं. सागर आणि त्यांचा मुलगा अभिजित हे छान ओळखीचे होते आणि त्यांच्याबरोबर एक डॉक्टर मित्र डॉ. कुमार ठकार येणार असं समजलं म्हणजे काही झालं तर बरोबर डॉक्टरही आहेत आणि मी जायचं नक्की केलं. विजय वाठारे हे या क्षेत्रात माहीर आहेत आणि चाळीसवेळा हरिश्चंद्रगड चढलेत असं समजलं. आणि काय होईल ते होईल जायचं असं मी ठरवलं.

या ट्रेकमध्ये आम्ही एकूण दहा जण होतो. विजय यांनी हा ट्रेक खास ज्येष्ठांसाठी ठरवला होता. एकटा अभिजित हा एकमेव अपवाद होता जो खरंच तरुण होता. हाही मनाला दिलासा होता. रविवारी, १८ जानेवारीला १०.२० ची कसारा पकडली. दुपारी, आम्ही सगळे कसारा रेल्वे स्थानकावर एकत्र जमलो. बहुतेक सर्व मंडळी मुंबई परिसरातली होती, तर कुमार, अभिजित आणि सागर पुण्याहून आले होते. तिथे आमचे कॅप्टन विजय यांनी दोन जीप आमच्यासाठी तयार ठेवल्या होत्या. त्यात बसून आम्ही निघालो. भंडारदरा धरण वाटेत लागलं. जाताना नासिक जिल्ह्यातील आवंदा–पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकेद गावातील पक्षीतीर्थ किंवा सर्वतीर्थ पाहिलं. त्याची कथा अशी की, रावण सीतेला पळवून नेत असताना पक्षीराज जटायूने जेव्हा रावणाला अडवायचा प्रयत्न केला तेव्हा रावणाने त्याचा पंख छाटला ते हे ठिकाण. पुढे श्रीरामाची भेट झाली. त्यांनी जमिनीत बाण मारून पाणी काढले व तडफडणाऱ्या जटायूला दिले. तेच टाकेदचे सर्वतीर्थ. तिथून निघालो आणि पुढे आम्ही भंडारदरा, राजूर मार्गे रतनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. खूप प्राचीन दगडी मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड वीतभर पाण्यात आहे असे दिसले. तिथून आम्ही परत भंडारदऱ्याला MTDC च्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आलो. रात्री जेवण झाल्यावर कॅम्पफायर झालं. ट्रेकचा मूड तयार झाला. थंडी आम्हा मुंबईकरांना चांगलीच जाणवत होती. पण शेकोटीची ऊब होती. सगळ्यांनी आपापले असलेले गायन कौशल्य दाखवले.

सोमवारी पहाटे लवकर आटपून आम्ही जीपने हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावातील सरपंच भास्कर बदड यांच्या घरी पोहोचलो. तिथे आम्हाला मस्त गरम गरम उपम्याचा नाश्ता मिळाला. आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला. जास्तीचं समान गावातील चार भारवाहकांकडे देऊन सगळे सकाळी ९ वाजता चढायला लागलो. माझ्या पाठीवर छोटीशी सॅक होती. संपूर्ण वाट चढणीची होती पण वाटेत बऱ्यापैकी झाडीचा रस्ता होता. सगळ्यात शेवटी मी व माझे मार्गदर्शक सागर ओक पोहोचलो. सगळे इतके भरभर चढून जायचे नि आमच्यासाठी थांबायचे. मी खूपच ढ. मला भीती वाटायला लागली की आलो खरे वर, पण उतरताना काय? सर्वजणांनी तीनेक तासांत गडाचा माथा गाठला. वर पोहोचलेली मंडळी तिथल्या एका घराबाहेर जेवणासाठी थांबली होती. मस्त गरम गरम पिठलं-भाकरी पाहून सगळा शीण निघून गेला.

दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही तिथेच जवळपास असलेले श्री हरिश्चंद्रेश्वराचे पुरातन मंदिर व भल्या मोठ्या दगडी गुहेत कोरलेलं केदारेश्वराचे अद्वितीय मंदिर पाहिलं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ही मोठ्ठी पिंड कंबरभर पाण्यात आहे आणि ते पाणी बारा महिने थंडगार असतं. एक आख्यायिका या शिवलिंगाबद्दल ऐकली. शिवलिंगाच्या चार बाजूला चार दगडी खांब आहेत ज्यापैकी तीन खांब, जे तीन पूर्ण झालेली युगे आहेत असं मानतात आणि एक शिल्लक असलेला खांब हा कलियुगाचं द्योतक आहे आणि तो खांब जेव्हा झिजून जाईल तो या युगाचा अंत असेल अशी लोकांत मान्यता आहे. त्या गुहेसमोर बसलो खूप प्रसन्न वाटलं.

गडावर भरपूर वर्दळ होती. मंदिराच्या जवळपास अजून काही गुहा आहेत त्या बघून आम्ही पुढे तासभर चालून प्रसिद्ध कोकणकड्यावर गेलो. कोकणकडा नामक भारतातील बहुधा सर्वात मोठ्या एककातळी उभ्या–आडव्या, बशीच्या आकाराच्या कड्याच्या वरच्या काठावर सूर्यास्त पाहायला जाऊन थांबलो. थंडीमुळे धुकं होतं. फार लांबचे डोंगर स्पष्ट दिसत नव्हते. निसर्गाचं ते अक्राळ-विक्राळ स्वरूप पाहून मला तर खूपच भारी वाटलं. सूर्योदय बघायची उत्सुकता होती. पण सूर्य अगदी क्षितिजावर जाऊन अस्तंगत न होता थोडा वरच बुडाला असं वाटलं. लांब डावीकडे नाणेघाटावरील अंगठा ओळखता आला आणि जरा अलीकडे खालच्या अंगाला माळशेज घाटाचा रखवालदार, मोरोशीचा भैरवगड दिसला. मात्र लांबचं स्पष्ट दिसत नसलं तरी आमची वैयक्तिक छायाचित्रं खूप निघाली. सूर्यास्तानंतर पटकन अंधार पडला. आमच्या घरात गरम गरम जेवण बनायला सुरुवात झाली होती. त्यात आमच्या ग्रुपमधीलअर्पिता देसाई हिने सगळ्यांसाठीच्या पोळ्या लाटून दिल्या. सगळ्यांनी मस्त जेवण केले. वर अक्षरशः चांदण्यांच्या लाह्या विखुरल्या होत्या. अस आकाश फार वर्षांनी पाहिलं. मृग नक्षत्र डोक्यावरच होतं. जेवण झाल्यावर लवकर झोपायचं ठरलं. पण तंबूत झोप येईल अस वाटतं नव्हतं. कसे काय राहतात हे रहिवासी लोक अशा वातावरणात, कौतुक वाटलं.

सकाळी सगळ्यांनी खाली पाचनाईसाठी उतरायची वाट धरली. आता मात्र पोटात मोठ्ठा गोळा आला होता. उतरताना पाय घसरत होते. सगळे आपापल्या वेगाने उतरत होते. आता अर्पिता माझी गाईड होती. सागरलाही माझी काळजी आणि जबाबदारी असल्याने आम्ही तिघे माझ्या वेगाने हळूहळू उतरत होतो. इतका सुंदर निसर्ग भोवती होता. पक्षी मस्त किलबिल करत होते, पण मला मात्र फक्त दगड दिसत होते. डावा पाय टाकू की उजवा.अर्पिता मला सूचना देत होती. मी बघ कसा पाय टाकतेय तसा अडवा पाय टाक. मला डावा उजवाही हळूहळू कळेना अस झालं. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र माझं अवसान गळत चाललं होत. आम्हाला शोधत विजय वाठारे वर आले आणि अक्षरशः लहान बाळासारखा हात धरून मी खाली आलो. त्यांच्या सराईत हातातली मजबूत पकड जाणवत होती. जणू देवच भेटला अस मला वाटल. वयाच्या एक्काहत्तरव्या वर्षी माणूस किती खंबीर नेतृत्व करू शकतो हे पाहून कौतुक वाटलं. सर्व नवीन मित्रांच्या बरोबर माझा पहिला वहिला ट्रेक पार पडला.

Comments
Add Comment