Sunday, January 25, 2026

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी यांच्या संकल्पनेतून, उद्योजक सिंघानिया यांच्या सहकार्याने वाहनाला नवी झळाळी

सन १९३७ मध्ये निर्मित आणि सन १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन (Restoration) करण्यात आले आहे. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक श्री. गौतम सिंघानिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.
‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची सन १९३७ मध्ये इंग्लंडमधील लेलँड (Leyland) या कंपनीत निर्मिती करण्यात आली. तर, दिनांक २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालिन उंच इमारती, गोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.
दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात (मुंबई डॉक) उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली होती. दारुगोळा, स्फोटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळे, जहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले. अशा भीषण परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेतले. बंदरावरील उंच गोदामांतील आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणे, जहाजाच्या आसपास अडकलेल्यांना वाचवणे तसेच जखमींना खाली उतरवणे आदी शर्थीची कामे या वाहनाच्या मदतीने अविरत सुरू होती. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. मात्र, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.
‘टर्न टेबल शिडी’ असलेले हे वाहन कालांतराने नादुरुस्त झाले आणि त्यास स्मृतिरुपात मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयी म्हणजेच भायखळा अग्निशमन केंद्रात जतन करुन ठेवण्यात आले. दरम्यान, या वाहनाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी त्याचे पुनर्जतन करण्याची संकल्पना मांडली. तसेच, प्रसिद्ध उद्योजक श्री. गौतम सिंघानिया यांच्या सहकार्यातून या वाहनाला नवी झळाळी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जे. के. इन्व्हेस्टर बॉम्बे लिमिटेड या कंपनीने सुपर कार क्लब गॅरेजमध्ये या वाहनाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.
अनेक दशकांपासून बंद असलेले हे वाहन पुन्हा सुरू करणे, वाहनाची झिजलेली यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या वाहनाचे मूळ सुटे भाग (स्पेअर पार्टस्) मिळवणे अत्यंत जिकरीचे कार्य होते. वाहनाची बनावट खूप जुनी असल्याने त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी तत्कालिन तांत्रिक नोंदी, आराखडे आणि संदर्भ शोधण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक सुट्या भागाची संरचना (डिझाइन) तयार करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सुटे भाग नव्याने बनविण्यात आले. आता हे वाहन रस्त्यांवर दिमाखात धावण्यास सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांची संकल्पना, उद्योजक श्री. गौतम सिंघानिया यांचे सहकार्य आणि या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांची संशोधकता व कल्पकतेच्या बळावर मुंबई अग्निशमन दलाच्या या ऐतिहासिक वाहनास नवी झळाळी मिळाली आहे.
*
(जसंवि/५९३)
Comments
Add Comment