Sunday, January 25, 2026

दर कपातीच्या काळात मुदत ठेवींचे व्यवस्थापन

दर कपातीच्या काळात मुदत ठेवींचे व्यवस्थापन

श्री. एस. सुंदर, (लेखक श्रीराम फायनान्स कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ आहेत.)

भारताचे आर्थिक विश्व झपाट्याने विकसित होत असताना बचत करणाऱ्या व्यक्ती अधिक विचारपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत. सध्या मुदतठेवींवर दिला जाणारा भर हा घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी काळजीपूर्वक केलेले नियोजन होय, असेच चित्र यातून प्रतिबिंबित होत आहे. व्याजदरांमध्ये सातत्याने बदल होत असले तरी, मुदत ठेवी अनेक भारतीय कुटुंबांसाठी एक विश्वासार्ह बचत पर्याय म्हणून आपले अढळ स्थान टिकवून आहेत. आर्थिक जग झपाट्याने बदलत असतानाही, मुदत ठेवींचा साधेपणा, विश्वासार्हता आणि मनःशांती यांमध्येच तिची खरीखुरी ताकद दडलेली आहे.

काही वर्षांत, भारतात अनेकांसाठी मुदत ठेवी (एफडी) हा पुन्हा महत्त्वाचा बचत पर्याय म्हणून उदयास आला आहे. व्याजदर कपातीच्या सध्याच्या टप्प्यात, ठेवीदार त्यांच्या मुदत ठेवी किती काळ आणि कोणत्या दराने ठेवायच्या, या बाबींकडे अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत. विशेषतः स्थिरता आणि अपेक्षित परतावा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असलेल्या व्यक्ती खूपच काळजीपूर्वक पावले उचलत आहेत. व्याजदर कमी होत चालल्याने बँकांनी मुदत ठेवींच्या दरातदेखील अनुरूप फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे अनेक ठेवीदांराना ठेवींचे व्यवस्थापन त्याचबरोबर ठेवींमध्ये किती काळ आपली बचत ठेवायची, याबद्दल काळजीपूर्वक विचार करण्यास भाग पाडले आहे.

मुदत ठेवींबाबत फेरविचार का केला जात आहे?

भारतात मुदत ठेवी हा बचतप्रकार नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. कारण गुंतवणुकीचा हा प्रकार अतिशय सोपा आणि तितकाच विश्वासार्ह आहे. गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी किती पैसे मिळतील, हे अतिशय अचूकपणे माहीत असते. शेअरबाजाराप्रमाणे ठेवींत दररोज चढ-उतार होत नाही आणि परताव्याबाबत कोणतीही अनिश्चितता झेलावी लागत नाही. काही काळासाठी व्याजदर अतिशय चढे होते, मात्र ते आता कमी होऊ लागले आहेत. परिणामी, अनेक ठेवीदार त्यांच्या आर्थिक नियोजनाचा प्रमुख घटक असलेल्या मुदत ठेवींबाबत पुनर्विचार करताना दिसत आहेत. बहुतेक व्यक्तींसाठी इतर गुंतवणुकीऐवजी केवळ मुदत ठेवींतील गुंतवणुकीचाच फेरविचार करण्याबाबतची ही स्थिती नाही. तर गुंतवणुकीत संतुलन राखण्यासाठी अन्य पर्यायांबरोबरच ठेवींसारख्या पर्यायाचाही अतिशय योग्य रितीने वापर करण्याशी संबंधित आहे.

दबावाचा नव्हे, तर योग्य वेळेचा विचार करा

जेव्हा व्याजदर कपातीला प्रारंभ होतो, तेव्हा योग्य वेळ हा नैसर्गिकरीत्या अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. गुंतवणूकदार घाई करत आहेत किंवा भीतीपोटी पावले उचलत आहेत, असा याचा अर्थ मुळीच नाही. त्यात विचारपूर्वक नियोजनाचे प्रतिबिंब दिसून येते. भविष्यात जर दरात आणखी कपात झाली तर आपल्याला अपेक्षित असलेला परतावा मिळेल का आणि यासाठी सध्याच्या दरांनुसार ठेवींमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की नाही, याचा ठेवीदार विचार करत आहेत. अल्प-मुदतीच्या प्रतिक्रियांऐवजी निश्चितता आणि स्पष्ट चित्र यावर ते आपले लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.

आज गुंतवणूकदार मुदत ठेवींत कशा पध्दतीने गुंतवणूक करावी, याबद्दल अधिक काळजीपूर्वक निर्णय घेताना दिसत आहेत. आपली संपूर्ण बचत एकाच ठेवीमध्ये ठेवण्याऐवजी, ते त्यांच्या गरजेनुसार विविध मुदतींचे पर्याय निवडत आहेत. काही व्यक्ती अल्प-मुदतीच्या ठेवींना पसंती देत आहेत. आपल्याला पैसे सहज उपलब्ध होतील, हा त्यामागील हेतू आहे. तर काही जण प्रदीर्घ कालावधीत स्थिर परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून दीर्घ-मुदतीच्या ठेवींचा विचार करतात. उदाहरणार्थ, व्याजाच्या उत्पन्नावर पूर्णपणे अवलंबून असलेली सेवानिवृत्त व्यक्ती नियमित रोख प्रवाह मिळण्यासाठी आपल्या बचतीचा काही भाग दीर्घ-मुदतीच्या मुदत ठेवींमध्ये ठेवू शकते. त्याच्याच जोडीला हव्या त्या प्रसंगी पैसे सहज उपलब्ध होण्यासाठी काही निधी अल्प-मुदतीच्या ठेवींमध्ये ठेवू शकते.

तरुण गुंतवणूकदार मुदत ठेवींचा वापर अतिशय वेगळ्या पद्धतीने करू शकतात. काही जण भविष्यकालीन आर्थिक नियोजन आखत असताना अतिरिक्त पैसे सुरक्षितपणे ठेवण्यासाठी मुदतठेवींचा पर्याय निवडतात. अनिश्चित काळात कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता स्थिर परतावा मिळवण्यासाठी त्यांच्याकरिता मुदत ठेवी हा एक उत्तम मार्ग आहे.

स्थिरता, पूर्वअंदाजावर लक्ष केंद्रित करा

अनेक गुंतवणूकदार आगाऊ अंदाजाला अतिशय महत्त्व देत आहेत. विशेषतः व्याजदर सतत बदलत असताना आपल्याला व्याजापोटी किती रक्कम मिळेल आणि पैसे कधी उपलब्ध होतील, हे आधीच माहित असणे कधीही मनाला दिलासा देणारी बाबच ठरते. एकदा मुदत ठेवीत पैसे गुंतवल्यानंतर, निवडलेल्या कालावधीसाठी परतावा हमखास मिळतो. यामुळे, नंतर कमी व्याजदराच्या ठेवीत पैसे पुन्हा गुंतवण्याच्या अनिश्चिततेचे प्रमाण आपोआप कमी होते. दररोजचा खर्च, शिक्षणाचा खर्च किंवा निवृत्तीवेतनाचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक स्थिरता हा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो.

व्याजदरातील चढ-उताराचे आकलन

व्याजदर प्रवाही असतात. त्यांच्यात चढउतार सुरूच असतात. ते काही काळासाठी वाढतात आणि नंतर कमी होतात. व्याजदरातील या बदलांचा बचतीच्या नियोजनावर प्रभाव पडत असतो. जेव्हा व्याजदर तुलनेने चढे असतात, तेव्हा बचत करणारे अनेकदा दीर्घ कालावधीसाठी ठेवींत गुंतवणूकीचा विचार करतात. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा लवचिकता हा मुद्दा अधिक मौल्यवान ठरतो.

बचतीच्या नियोजनात मुदत ठेवींची भूमिका

वैयक्तिक आर्थिक नियोजनात मुदत ठेवी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्या शेअरबाजारातील समभागांसारख्या वाढ-केंद्रित गुंतवणुकींची जागा घेण्यासाठी नसून एकूण बचतीमध्ये संतुलन राखण्यास सहाय्य करतात. मुदत ठेवी भांडवलाचे संरक्षण करतात. त्याचबरोबर नियमित आणि निश्चित उत्पन्न मिळवून देतात. तसेच कौटुंबिक आर्थिक व्यवस्थेला स्थिरतेचे कवच प्रदान करतात. व्याजदरांमध्ये बदल होणाऱ्या, निश्चिततेला महत्त्व दिल्या जाणाऱ्या काळात मुदत ठेवी खूपच उपयुक्त ठरल्या आहेत.

Comments
Add Comment