Sunday, January 25, 2026

प्रेम म्हणजे ऑक्सिजन

प्रेम म्हणजे ऑक्सिजन
मनस्विनी,पूर्णिमा शिंदे

प्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक सुरेल सूर प्राप्त होतो. प्रेम कुणावर करावं ? याचं उत्तर कुसुमाग्रज देतात. प्रेम कुणावरही करावं. गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खड्गाच्या पात्यावरही करावं.पुरेसं प्रेम लाभलं की माणसाचं जीवन सुंदर होतं. त्याचं जीवन हे तणावमुक्त होतं. आनंददायी होतं. मनाची प्रसन्नता व्यक्तीला दिव्यता, भव्यता देते. पण मनाचं नैराश्य मात्र व्यक्तीला चितेच्या आणि चिंतेच्या खाईत, खोलात ढकलते. आयुष्यात रस उरत नाही. निरुत्साही, खच्चीकरण आणि खुंटीत झालेलं जीवन ही आहेत सुखदुःखाची दोन रुपं. पण दुःख, थकवा, मानसिक ताण हे आकाशातील निराशेचे मळभ असतात. अविवेकाची काजळी असते. ते दूर करून व्यक्तीच्या जीवनात प्रकाश यावा, आनंद यावा आणि आत्मविश्वास लाभावा यासाठी उपयुक्त असतं ते प्रेम. संवाद,जिव्हाळा आणि आपुलकी, काळजी, संरक्षण. माणूस हा परस्परावलंबी प्राणी आहे. संस्कृतीतूनच तो घडतो. निसर्गाकडून शिकतो आणि समाजाकडून सुधारतो. सुंदरतेचा विश्वास मनावर कोरला की जगही सुंदर दिसू लागतं.

प्रेम इतकं सुंदर, अनमोल, अद्वितीय आहे की जणू उन्नती उत्साहाकडे नेणारी हवीहवीशी भावना. नात्यातील सौंदर्य, शब्दातील मधुरता हे प्रेम. प्रेम म्हणजे गोड तुरुंग, जगण्याची बहार, मनीची पूर्व आतुरता, व्याकुळता, विश्वास, स्नेह, आशा सामंजस्य आणि समर्पण म्हणजे प्रेम. बेभान बेधुंद करून सगळ्या जगाचा विसर पडतो ते प्रेम. हृदयाच्या खोलवर प्रीत अत्तराच्या कुपीत सजवली जाते आणि डोळ्यातून ओसंडून वाहू लागते. इंद्रधनुच्या सप्तरंगाप्रमाणे ही प्रेमाची उधळण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साथ निभावणारी असावी. भावनांचा ओलावा, हाती हात, प्रेमाची साथ यांची गुंफण म्हणजे नितळ प्रेम, सोनेरी चंदेरी अनुभव. आपल्यापेक्षा समोरच्याचा विचार जास्त करायला लावते ते प्रेम असतं. प्रेम म्हणजे अधीरता आणि आतुरता. प्रेम म्हणजे स्नेह, मिलन, प्रीत. एखाद्या गोष्टीचा लळा लागतो तसं प्रेम असतं अद्भुत. पृथ्वीवरील द्वेष मत्सर अनैतिकतेचा नाश करून निस्सीम, निस्वार्थ प्रेम करावं. कळीनं उमलावं फुलासाठी. फुलानं उमलावं प्रीतीसाठी, आणि प्रीतीनं उधळावं एकमेकांसाठी. अशा अजरामर प्रेमाला अंत नसतो. ते निरंतर बहरत असतं.

प्रेमाने साथ घातली तर रानातलं पाखरू सुद्धा जवळ येतं. प्रेमाची किमया न्यारीच. प्रेम म्हणजे जीवनाचा ऑक्सिजन. प्रेम म्हणजे श्वास. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम नसेल तर हे जग रेताळ वाळवंटा सारखे आणि जर प्रेम असेल तर जीवनात हिरवळच वाटेल. मनाच्या उभारी साठी प्रेमाचा ओलावा महत्त्वाचा असतो. कोणीतरी आपलं आहे ही गोष्ट सुखावून जाते. आणि जगायला भाग पाडते. प्रेम अशी गोष्ट आहे जी तहानभूक विसरून, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग, जगात राहून माणूस एकटा राहतो त्या प्रेमासाठी. वन वन हिंडतो प्रेमासाठी. वाट्टेल ती गोष्ट करतो ती प्रेमासाठी. असं असतं प्रेम. डोळ्यात मनात, डोक्यात, हृदयात इतकंच काय स्वप्नात देखील प्रेम. क्षणोक्षणी जगणं हेच जगणं आणि जागणं म्हणजे प्रेम असतं. प्रेमाशिवाय प्रत्येक व्यक्ती अपूर्णच. त्याच्या आयुष्यात प्रेमाची पोकळी कोणीच भरू शकत नाही. देत राहिल्याने वाढतं त्याला प्रेम म्हणतात. देतानाच घ्यायचा असतो त्याला विश्वास म्हणतात आणि सारं जग विसरायला लावतो त्याला आनंद म्हणतात. तो आनंद म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे शक्ती, ऊर्जा, ओढ, व्याकुळता. आयुष्याला सजवण्यासाठी प्रेम हे देवाघरचे देणे आहे.

Comments
Add Comment