र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच वर्षे देशाच्या नव्या उभारणीचा विचार सिनेमाच्या कथानकात, तत्कालीन लोकप्रिय गाण्यात गुंफलेला दिसून येतो.
चित्रपटसृष्टीने, विशेषत: जुन्या गीतकरांनी, आधुनिक प्रगतिशील भारताची मानसिकता घडवण्याचा विचार डोळ्यांसमोर ठेवल्याचेही दिसते. आपल्या जुन्या सांस्कृतिक वैभवाचा गौरव करतानाच या चिंतनशील गीतकारांनी समाजात नवी जीवनमूल्ये रुजवण्याचाही प्रयत्न केल्याचे पुरावे अनेक गाण्यात दिसतात. राधू कर्माकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जिस देशमे गंगा बहती हैं’मध्ये शैलेन्द्रने राजकपूरसाठी लिहिलेल्या गाण्यातल्या ओळी प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या होत्या -
“होठोंपे सच्चाई रहती है,
जहाँ दिलमें सफ़ाई रहती है,
हम उस देशके वासी हैं,
जिस देशमें गंगा बहती है.”
शैलेंद्रसाहेबांनी गाण्यात भारताचे नेमके वेगळेपण केवळ ४ ओळीत मांडले होते. ‘सर्व दिशांनी चांगले विचार आमच्याकडे येऊ देत’ या ऋग्वेदातील (१.८९.१) प्रार्थनेला सूचित करतानाच, भारतावर हिंसक, क्रूर आक्रमणे करणाऱ्यांनाही या सहिष्णू समाजाने कसे सामावून घेतले, चिनी किंवा रशियन क्रांतीसारखे केवळ पोट भरण्याच्या इहवादी तत्त्वज्ञानाला कसे बाजूला ठेवले इत्यादी सर्व शैलेन्द्रजी अत्यंत कलात्मकपणे सूचित करतात. एका कडव्यात ते म्हणतात -
“जो जिससे मिला सिखा हमने,
गैरोंको भी अपनाया हमने,
मतलबके लिये अंधे होकर,
रोटीको नही पूजा हमने.”
असेच एक गाणे होते १९६० सालच्या ‘हम हिंदुस्तानी’मध्ये! परंतु ‘हम हिंदुस्तानी’ हा नावावरून वाटतो तसा काही देशप्रेमावरचा सिनेमा नव्हता. ज्यांनी १९५६ला ‘जागृती’ काढून फिल्मफेयरचे १९५६चे सर्वोत्कृष्ट चित्रपट पारितोषिक जिंकले होते त्या सशाधर मुखर्जीनीच ‘हम हिंदुस्तानी’ काढला होता. दिग्दर्शक होते राम मुखर्जी. सुनील दत्त, आशा पारेख, जॉय मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात हेलन चक्क जॉय मुखर्जीच्या नायिकेच्या भूमिकेत होती. दुर्दैवाने तिला उत्तम अभिनय करूनही परत कधीच असा रोल मिळाला नाही. संजीवकुमारचा हा पहिला चित्रपट.
‘हम हिंदुस्तानी’ ही एका धोकेबाज व्यक्तीने केलेल्या श्रीमंत वडिलांच्या फसगतीमुळे त्यांच्या दोन मुलांना भोगाव्या लागलेल्या अडचणीची कथा होती. बासू पोरीबर या १९५२च्या मूळ बंगाली सिनेमाचा हा रिमेक होता. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट झाला व सिनेमाने धंदाही चांगला केला. गीतकार होते राजेंद्र कृष्ण, साहीर लुधियानवी आणि प्रेम धवन. संगीत होते जद्दनबाई आणि सरस्वतीदेवी यांच्यापाठोपाठ संगीत क्षेत्रात आलेल्या तिसऱ्या महिला संगीत-दिग्दर्शिका उषा खन्ना यांचे!
प्रेम धवन यांचे एक गाणे आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. उद्याच्या प्रजासत्ताकदिनी ते कदाचित अनेकदा ऐकायलाही मिळेल. त्या गाण्याच्या आशयाला १००% न्याय देणारा सात्त्विक, नितळ आवाज होता मुकेशचंद्र माथुर यांचा. स्वतंत्र भारताच्या सगळ्या नागरिकांना एक प्रेरणादायी आवाहन करणारे धवनसाहेबांचे शब्द होते -
‘छोड़ो कलकी बातें, कलकी बात पुरानी,
नए दौरमें लिखेंगे, मिलकर नई कहानी,
हम हिन्दुस्तानी, हम हिन्दुस्तानी...’
इंग्रजी राजवटीमधला देशाच्या गुलामीचा इतिहास विसरून नव्या दिशेने प्रगतीची घोडदौड गाठणे हेच आपले ध्येय हवे हे सांगताना कवी जगात सुरू असलेल्या तत्कालीन वैज्ञानिक प्रगतीचीही नोंद घेतात. अमेरिकेचे ‘अपोलो-११’ हे अंतराळयान चंद्रावर उतरले ते १९६९ साली. पण जगभर सुरू असलेल्या अंतराळ संशोधनाची आठवण भारतीय तरुणांना १९६० सालीच करून देताना ते म्हणतात, जग चंद्रलोकाच्या दारात पोहोचले आहे. आपण या जगाशी नाते जोडून वेगाने पुढे गेले पाहिजे. जुनी बंधने झुगारून दिली पाहिजेत.
‘आज पुरानी ज़ंजीरोंको तोड़ चुके हैं,
क्या देखें उस मंज़िलको जो छोड़ चुके हैं,
चांदके दरपर जा पहुँचा है आज ज़माना,
नए जगतसे हम भी नाता जोड़ चुके हैं.
नया खून है, नई उमंगें, अब है नई जवानी,
हम हिन्दुस्तानी...’
आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत नवी स्वप्ने साकार करायची आहेत हे सांगताना ते विन्ध्य पर्वत ओलांडणाऱ्या, एका घोटात समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकणाऱ्या अगस्ती ऋषींचा पराक्रमही सुचीत करताना म्हणतात -
‘हमको कितने ताजमहल हैं और बनाने,
कितनेही अजंता हमको और सजाने,
अभी पलटना है रुख कितने दरियाओंका,
कितने पवर्त राहोंसे हैं आज हटाने,
नया खून है...’
चित्रपटासाठी गीतलेखन एवढे एकच क्षेत्र निवडले असतानाही तत्कालीन कवी किती सजगपणे आजूबाजूच्या नव्या जगाकडे पाहत होते हे पुढच्या कडव्यात लक्षात येते. भारतात शारीरिक कष्टाच्या कामांना कमी लेखले जायचे. आता आधुनिक भारताने पाश्चिमात्यांकडून श्रमप्रतिष्ठेचे मूल्यही शिकावे अशी कवीची इच्छा आहे -
‘आओ मेहनतको अपना ईमान बनाएँ,
अपने हाथोंको अपना भगवान बनाएँ,
रामकी इस धरतीको, गौतमकी भूमिको,
सपनोंसे भी प्यारा हिंदुस्तान बनाएँ,
नया खून है....’
आपल्याला लाभलेल्या विपुल नैसर्गिक संपत्तीची आठवण कवी करून देतो. गंगा यमुनेसारख्या मोठ्या नद्यांच्या पाण्याचा योग्य वापर करून शेती वाढवली पाहिजे असेही त्याचे आवाहन आहे-
‘हर ज़र्रा है मोती आँख उठाकर देखो,
माटीमे सोना है हाथ बढ़ाकर देखो,
सोनेकी ये गंगा है, चांदीकी यमुना,
चाहो तो पत्थरसे धान उगाकर देखो,
नया खून है...’
सर्व जगभर पसरलेल्या इंग्रजी साम्राज्याशी लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवले आहे तर आता पूर्वीची गुलामीची मानसिकता घालवून विजयी वृत्ती अंगीकारली पाहिजे असेही तो बजावतो.
‘फिल्मीस्तान’च्या १९५४ साली आलेल्या ‘जागृती’चे गीतकार कवी प्रदीप यांच्यासारखी ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल’ टाईप व्यक्ती केंद्रित, व्यक्तिपूजक मांडणी न करता प्रेम धवनजी देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांनाही त्यांचे श्रेय द्यायला विसरत नाहीत. ‘अनेक घरांनी त्यांचे कुलदीपक विझवून देशाच्या स्वातंत्र्याचे दीप उजळले आहेत’ याची आठवण करून देताना ते म्हणतात-
‘दाग गुलामीका धोया है जान लुटाके,
दीप जलाए हैं ये कितने दीप बुझाके,
ली है आज़ादी तो फिर इस आज़ादीको,
रखना होगा हर दुश्मनसे आज बचाके,
नया खून है...’ आज तरुण पिढी देशासाठी मोठमोठी स्वप्ने पाहत असताना देशविरोधी राजकारणी मात्र भाषा, जात, प्रदेश या निकषावर देशाची एकात्मता खिळखिळी करताना दिसतात. आपण या दुष्प्रवृत्तीना
“छोडो कलकी बाते, कलकी बात पुरानी”
असे बजावणार आहोत की नाही? हाच महत्वाचा प्रश्न आहे.