मुंबई : केंद्रातील मोदी सकारने पेन्शन अन् पगार वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्या (पीएसजीआयसी) यांच्या तब्बल ४६ हजार कर्मचारी अन् ४६ हजारांपेक्षा अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन अन् पेन्शन सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनमधील सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १० टक्के वाढ मंजूर झाली आहे. तर नाबार्डमधील ग्रुप 'अ', 'ब' व 'क' कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन-भत्त्यात वाढ मिळेल. तर पीएसजीआयसी कर्मचाऱ्यांसाठी एकूण वेतन बिलात १२.४१ टक्के वाढ आणि मूलभूत वेतन व महागाई भत्त्यात १४ टक्के वाढ मिळणार आहे. आरबीआयच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पेन्शन व महागाई सवलतीवर १ नोव्हेंबर २०२२ पासून १० टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे. तर नाबार्डमधील कर्मचाऱ्यांना २० टक्के वाढ तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला पूर्वीच्या आरबीआय-नाबार्ड पेन्शनशी जुळवून घेतले जाणार आहे. ही माहिती केंद्र सरकारने नुकतेच जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.






