चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी रविवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ‘भाषा शहीद दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात स्टॅलिन यांनी १९६० च्या हिंदी-विरोधी चळवळीतील शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, तामिळनाडू नेहमीच आपल्या भाषिक ओळखीचे रक्षण करेल. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, “भाषा शहीद दिनानिमित्त मी स्पष्ट करतो की, तेव्हाही हिंदीसाठी कोणतेही स्थान नव्हते, आताही नाही आणि कधीही राहणार नाही.” या पोस्टसोबत त्यांनी १९६५ च्या ऐतिहासिक हिंदी-विरोधी चळवळीचा व्हिडीओही शेअर केला, ज्यात द्रमुकचे दिग्गज नेते सी.एन.अन्नादुरई आणि एम.करुणानिधी यांचे योगदान अधोरेखित केले आहे. स्टॅलिन यांनी चेन्नईतील “भाषा शहीद” थलामुथु आणि नटरासन यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. या कार्यक्रमाच्या भाग म्हणून त्यांनी चेन्नई महानगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत या शहीदांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. १९६४-६५ दरम्यान हिंदीला अधिकृत भाषा बनवण्याच्या विरोधात केलेल्या चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावले होते; त्यांना ‘भाषा शहीद’ असे संबोधले जाते. त्या काळात अनेक तरुणांनी विरोधार्थ आत्मदहन केले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये ‘द्विभाषिक सूत्र’ स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये फक्त तमिळ आणि इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. स्टॅलिन आणि द्रमुक सरकार सतत केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणचा विरोध करत आहेत.





