थंडी आणखी वाढणार
नवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक पावसाचा मारा असा अनुभव नागरिकांना येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी आणखी एक महत्त्वाचा इशारा जारी केला असून देशातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता असून थंडीचा जोर अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
हवामान विभागानुसार पुढील ४८ तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि पुडुचेरी या ५ राज्यांत जोरदार पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. २७ व २८ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व बर्फवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांत गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २५ जानेवारी रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि माहे येथे २६ जानेवारी रोजी विजांसह मेघगर्जनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर भारतात शीतलहरीचा इशारा
पुढील २४ तासांत उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्या, कानपूर, रामपूर, बिजनौर, रायबरेली, आग्रा, मथुरा आणि अलीगड येथे सकाळच्या वेळी शीतलहर जाणवणार आहे. हरियाणातील गुरुग्राम आणि सोनीपत येथेही तीव्र थंडीचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील अमृतसर, जालंधर, बठिंडा, पटियाला, होशियारपूर आणि मोहाली येथे ताशी १० ते १५ किमी वेगाने वाऱ्यांसह शीतलहर राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील हवामानाचा अंदाज
दिल्लीकरांसाठीही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. २७ जानेवारी रोजी राजधानीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी सकाळी तापमानात आणखी घट होणार असून ताशी १० ते १५ किमी वेगाने थंड वारे वाहणार आहेत. दिल्लीचे कमाल तापमान सुमारे १७ अंश सेल्सियस तर किमान तापमान ४ अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.






