तिमिरातून तेजाकडे...

अंधार कोणाच्या आयुष्यात नाही असं होतं का? कधी बाहेरचा, तर कधी आतला, पण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तिमिरातून चाललेलाच असतो. मात्र त्या तिमिरात थांबणं नव्हे, तर त्यातून तेज शोधणं हेच खरं जगणं आहे.
“रात्र कितीही काळी असो, पहाट एक दिवस होतेच...”
हीच ओळ सांगते-आशा कधी मरत नाही.
जीवन म्हणजे चढ-उतारांचा खेळ
एखादं झाड वादळात मोडतं, पण त्याचं बीज पुन्हा जमिनीत रुजतं आणि नव्याने हिरवं जग निर्माण होतं. तसेच आपणही-एखादं संकट, एखादा अपघात, एखादी हानी आपल्याला पाडते, पण तोच क्षण आपल्याला उभंही करतो.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील अंधार बघा-गरीब पार्श्वभूमी, साधं गाव, मर्यादित साधनं. पण त्यांनी त्या अंधारातून ऊर्जा घेतली आणि अख्ख्या देशाला तेजाचा मार्ग दाखवला. त्यांचं वाक्य आजही प्रेरणादायी आहे.
त्यांच्या शब्दांत...
“If you fail, never give up because FAIL means ‘First Attempt In Learning’.”
अपयश म्हणजे अंत नव्हे, सुरुवात - नव्या तेजाची.
तिमिर म्हणजे शेवट नव्हे - नव्या प्रवासाची सुरुवात
‘अत्त दीप भव’- स्वतःचाच दीप बना
गौतम बुद्धांनी सांगितलेला हा संदेश आजही कालातीत आहे...
याचा अर्थ, जेव्हा साऱ्या दिशांना अंधार दाटतो, तेव्हा बाहेरच्या प्रकाशाची वाट पाहू नका; आपल्या आतला दिवा पेटवा.
आपल्यातच ती शक्ती आहे जी तिमिरावर विजय मिळवू शकते.
हा विचार आजच्या प्रत्येक मनुष्याला लागू होतो. इतरांचा आधार चांगला असतो, पण जो स्वतःच्या अंतर्मनावर विसंबतो, जो स्वतःच्या प्रकाशावर श्रद्धा ठेवतो. त्याचं तेज कधीही मंदावत नाही. एक अलीकडचे उदाहरण म्हणजे अनघा मोडक यांचे. अनघाताईंची दृष्टी एका आजारामुळे नंतर गेली. काय वाटलं असेल त्यावेळी त्यांना! पण आज बघा त्यांच्या गोड वाणीने त्या इतरांची अंतरे उजळीत आहेत. त्यांच्या जिभेवर सरस्वती आहे. ‘तेजाची आरती’ हा त्यांचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. दृष्टी गेली पण त्यांनी स्वत:चा आतला दीप उजळला आणि इतरांना प्रकाश दिला आनंद दिला. ती खरा स्वत:चा दीप झाली.
अशा असंख्य कहाण्या आपल्या आजूबाजूला आहेत. एका अपघातात दोन्ही पाय गमावलेले सुधा चंद्रन यांनी नृत्य सोडलं नाही. कृत्रिम पायावर नाचून त्यांनी जगाला सांगितलं “अंधार नाही, तर धैर्य हरवलं की माणूस हरतो.”
निसर्गही शिकवतो... अंधारानंतर प्रकाश येतो.
प्रत्येक रात्र संपल्यावर सूर्य उगवतो. काळोखातही काजवे उजेड निर्माण करतात. फुलं फक्त दिवसातच नव्हे, तर काही चांदण्या रात्री फुलतात. म्हणजेच निसर्गसुद्धा सांगतो, अंधारातही तेजाचा किरण असतो.
कवी बा. भ. बोरकर यांच्या ओळी आठवतात
“अंधाराला नका शाप देऊ, एक दिवा लावा...”
तेजाचा शोध दुसऱ्याने लावावा असं नाही, आपणच दिवा व्हायचं.
कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कामगार हे सारे लोक अंधारात दिवे ठरले. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःला संकटात टाकलं. हेच खरं तेज निःस्वार्थ सेवेचं. आजही अनेक तरुण शेती, पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास यासाठी गावोगावी काम करत आहेत. त्यांच्यामुळेच तिमिरातही आपलं समाजजीवन उजळतंय.
कधी कधी अंधार बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. भीती, अपराधभाव, निराशा, असुरक्षितता ही मनाची सावली आहे. पण जशी मेणबत्ती स्वतः जळते आणि प्रकाश देते, तसं आपल्यालाही थोडं ‘जळावं’ लागतं. प्रयत्नांनी, संयमाने, श्रद्धेने.
साने गुरुजी म्हणतात...
“मनातला दिवा जर विझला, तर बाहेरचे दिवे उपयोगाचे नाहीत.”
म्हणून प्रथम अंतर्मनात उजेड पेटवणं गरजेचं आहे.
प्रकाश म्हणजे केवळ बाहेरचं तेज नव्हे,
प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रेम, संवेदना, करुणा जो दुसऱ्याचा मार्ग उजळवतो. ज्या हाताने दुसऱ्याला उचललं जातं, ज्या शब्दाने एखाद्याचं मन हलकं होतं तेच खरं तेज.
“तिमिरातही तू दिवा बन, स्वतःच्या प्रकाशात जग उजळव.”
अंधार टाळता येत नाही, पण त्याला सामोरं जाता येतं. प्रत्येक अपयशात यशाची बीजं असतात, प्रत्येक अश्रूत हास्य दडलं असतं. तिमिर हा फक्त परीक्षा असते. आपण तेजासाठी तयार आहोत का, हे तपासणारी.
म्हणूनच आयुष्याचं सार एका ओळीत सांगता येईल...
“जेव्हा जीवन तिमिराचं वस्त्र चढवतं,
तेव्हाच अंतर्मनात तेजाची पहाट उगवते!”
तिमिरातून तेजाकडे जाणं म्हणजे केवळ जगण्याचं नव्हे, तर जाणीवेचं परिवर्तन. परिस्थिती नव्हे, दृष्टिकोन बदलला की उजेड दिसतो आणि आपण त्या प्रकाशाचे वाहक बनलो, की जग अधिक सुंदर होतं.
तिमिर टाळणं आपल्या हातात नसतं, पण त्यावर विजय मिळवणं नक्कीच शक्य असतं. प्रत्येक अंधारात एक नवा धडा असतो, प्रत्येक अपयशात एक यशाचं बीज लपलेलं असतं.
महत्त्वाचं म्हणजे आपल्यातल्या प्रकाशावर विश्वास ठेवणं.
“जेव्हा जग काळं वाटतं,
तेव्हा स्वतःचा दिवा लावायचा.
कारण खरी पहाट बाहेर नाही,
ती मनात उगवते…”
मंगेश पाडगावकरांची येथे मला कविता आठवते... ‘सांगा कस जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा’... तर जगू या आपण गाण म्हणत म्हणत आनंदाने.
“तिमिरातून तेजाकडे” - हे केवळ एक वाक्य नाही, तर जीवनाचं तत्त्व आहे. परिस्थिती नव्हे, दृष्टिकोन बदलला की अंधारही प्रकाशात बदलतो आणि जेव्हा आपण स्वतः उजळतो, तेव्हा जग उजळल्याशिवाय राहत नाही. आपल्यातला उजेड जिवंत ठेवा आणि जगाला उजळवा. माझ्याच गझलेचे दोन शेर मी येथे देते...
व्यथा, वेदना, दु:ख सारे विसरणार आहे. झुगारून सारे पुन्हा मी बहरणार आहे.
तिमीरास आता मला भ्यायचे का कशाला तिमीरा तुला मी दिव्याने उजळणार आहे.

Comments
Add Comment

जीवनशिक्षण

जीवनगंध,पूनम राणे विवारचा दिवस होता. खूप दिवस घराची साफसफाई करणे बाकी होते. आईने आदल्या दिवशी सर्वांना बजावून

प्रेम म्हणजे ऑक्सिजन

मनस्विनी,पूर्णिमा शिंदे प्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक

मदालसा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे आपली मुले जन्म-मरणाच्या चक्रामध्ये न गुरफटता त्यांना मुक्ती मिळावी या

माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’

संवाद,गुरुनाथ तेंडुलकर डोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड

छोडो कलकी बातें...

र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच

माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...

स्मृतिगंध,लता गुठे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून