बहुसंख्य नद्या आज धरणांनी अडवल्या गेल्या आहेत. पण आतील पाझर ओले ठेवत तसूतसुने पुढे सरकत भूगर्भ ओला ठेवण्याचे त्यांचे काम अखंड सुरू असते. काही नद्या वाटेतच सुकून जातात. पण जेथे थांबतात तेथे त्यांच्या काळजाशी काही ओल टिकून असते. ती ओल धरून चिवट मासे, कासवे, शंख-शिंपले, बेडूक, चिंबोऱ्या, ज्ञात-अज्ञात जलचर आपला जीव आकसून घेत नव्या हंगामाची प्रतीक्षा करीत राहतात. नदीवर प्रेम करणाऱ्या माणसांना त्यांच्या या सुषुप्त अस्तित्वाची जाणीव असते. ती त्यावर लेखन-वाचन, चिंतन-मनन करतात. कथा-कविता लिहितात. चित्रे काढतात. चित्रपट-माहितीपट काढतात. मृतप्राय होऊ घातलेल्या नदीला जणू सोबत देतात. तिचे सांत्वन करतात. तिचा आक्रोश जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा निसर्गचक्र फिरले, पाऊस आला, पाणी नाचू लागले की अशा नद्या जाग्या होतात. आत जीव धरून असलेले जलचर आपल्या अंथरुणाची वळकटी गुंडाळत उठतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात!
मी भारतातील अनेक नद्या पाहिल्या आहेत. त्यांच्या काठी वस्तीस राहिलो आहे. त्यांचे पाणी प्यायलो आहे. संगमांवर रेंगाळलो आहे, त्यांच्यातून मनसोक्त विहार केला आहे. अनेक नद्यांचे उगम, संगम, त्रिभूज प्रदेश पाहिले आहेत. श्रीनगरजवळ वेरीनाग येथून उगम पावणारी झेलम, लडाखमधून भारतात प्रवेशणारी सिंधू, तिची उपनदी शोक, दक्षिणेतील पेरियार-कालडी, गोव्यातील मांडवी, मध्य प्रदेश-गुजरात-महाराष्ट्रातून पूर्व-पश्चिम वाहणारी नर्मदा यांसारख्या अनेक नद्या जवळून पाहिल्या आहेत. रावी, चिनाब, झेलम, सतलज, गंगा-यमुना पुनःपुन्हा पाहिल्या आहेत. आसामातील ब्रह्मपुत्रा या देशातील सर्वांत मोठ्या नदीतून विहार केला आहे. जगातील सर्वांत सुंदर मानली जाणारी मेघालयातील डावकी पहिली आहे. तिचा स्वच्छ तळ आणि काठाला असणाऱ्या प्राचीन पाषाणखंडांच्या बाजूबाजूने प्रवास केला आहे! मेळघाटातील कोकटू नदीचा आदिम-अस्पर्श परिसर डोळे भरून पाहिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील पर्लकोटा नदीकाठी, मेळघाटातील कोलखास येथील सिपनाकाठी भटकंती केली आहे. मुक्कामी राहिलो आहे. जिच्या काठी कालिदासाची आवडती उज्जैन नगरी वसली ती सुंदर क्षिप्रा जवळून पाहिली आहे. (सुमारे दोनशे किलोमीटर लांबीची क्षिप्रा माळव्याची गंगा म्हणूनही ओळखली जाते. तिच्या काठी कुंभमेळा भरतो. ती सदैव वाहती राहावी म्हणून नर्मदेचे पाणी तिच्यात सोडले जाते.)
कर्नाटकातील थलकावेरी येथून उगम पावणारी कावेरी, भीमाशंकर येथून निघणारी भीमा, ब्रह्मगिरीवरून निघणारी गोदावरी, अशा अनेक नद्यांचे उगम मी अनावर कुतूहलाने पाहिले आहेत. महाबळेश्वर येथून निघणाऱ्या कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री यांच्या उगमस्थानी गेलो आहे. ऊन-पाऊस-थंडी अशा सर्व ऋतूंत त्या नद्या जवळून पाहिल्या आहेत. कराडला कृष्णा-कोयनेच्या संगमावर चिंब भिजलो आहे. तापोळा येथील कृष्णा, कोयना आणि सोळशी यांचा त्रिवेणी संगम डोळे भरून पाहिला आहे. त्या संगमावर जलविहार केला आहे. भिगवण येथे भीमेच्या बॅक वॉटरमध्ये मनसोक्त भ्रमंती केली आहे. मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे नर्मदेत तृप्त फिरून आलो आहे. तेथील ओंकार पर्वताला होडीतून प्रदक्षिणा करत नर्मदा आणि कुवेरी नदीच्या संगमावरील आल्हादायक हवा आणि तो अद्भुत निसर्ग तनमनात भरून घेतला आहे. पुढे माहेश्वर येथे नर्मदेच्या काठी बसून नर्मदेचा अथांग प्रपंच डोळे भरून पाहिला आहे. त्यानेच अहिल्याबाई होळकर यांना पराक्रमाची विशाल स्वप्ने दाखवली असेल आणि ती कृतीत उतरवण्याची प्रेरणा दिली असेल हे मनोमन समजून घेतले आहे.
हिमाचलमध्ये चंबा खोऱ्यात रावी आणि सेहुल या नद्यांच्या संगमावर मी बोटीने फिरलो आहे. तेथील स्वच्छ निळे पाणी आणि बाजूच्या उंच हिरव्या डोंगरांगांचा सहवास अनुभवला आहे. रावी आणि सेहुलच्या संगमावरील विशाल पाणपसारा बघून, देहभान हरपून बसलो आहे. त्यात तरंगणाऱ्या सूचीपर्णी वृक्षांच्या ओंडक्यांनी प्राचीनकाळी लाकूड कसे वाहून नेले जात असेल याची चित्रमय झलक दाखवली आहे. मेघालयात डावकीतून फिरताना समुद्रसपाटीवरचा दगड-गोट्यांचा भूभाग तर दुसरीकडे हिमालयातील पर्वतरांगांच्या मधून वाहणाऱ्या उंचावरच्या प्रदेशातील छाती दडपून टाकणारा थरार अशी दोन्ही टोके अनुभवली आहेत. कावेरी, नर्मदा, गोदावरी, तापी अशा नद्या मी पुनःपुन्हा जवळून पाहिल्या आहेत. उजनी आणि कोयनेच्या विशाल जल-सान्निध्यात रमलो आहे. नद्यांचे उगम कोरडे कसे पडतात हेही पाहिले आहे. भीमाशंकराच्या देवळामागून होणारा भीमेचा उगम हे त्याचे एक उदाहरण! कर्नाटकात सोमेश्वर बीचवर बैंदूर नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहिला आहे. कन्याकुमारी येथे तीन, तर धनुषकोडी येथे दोन महासागरांचा संगम पाहिला आहे. या आणि अशा प्रवासात जागोजागी त्यांना भेटणाऱ्या असंख्य नद्याचे चुटपुटते दर्शन घेतले आहे.
उत्तराखंडमध्ये भागीरथी आणि अलकनंदेच्या मीलनातून गंगेचा उगम कसा होतो आणि तेथील लाल आणि हिरव्या रंगाचे पाणी एकमेकांना मिठीत कसे घेते ते पाहिले आहे. लडाखमध्ये बास्पा आणि झंस्कार या नद्यांचा रोमहर्षक संगम पाहिला आहे. लेहजवळ झंस्कार नदीच्या काठी ‘वजा तीस अंश सेल्सिअस’ तापमानात दोन रात्री तंबूमध्ये मुक्काम केला आहे. सिक्कीममधील अशाच थंडीत युमथांग व्हॅलीत झिरो पॉइंट येथे तिस्तेच्या धारेत हात घालून हाडापर्यंत शिरणाऱ्या थंडीचा थरार अनुभवला आहे. हिमालयात ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ला जाताना पहिले दोन दिवस नेपाळमधील दूधकोशी नदीच्या सान्निध्यात राहण्याचे भाग्य मला मिळाले आहे. हिमालयात बागिनी ग्लेशियरवर गिर्यारोहण करताना धौलीगंगेच्या काठी तंबूत मुक्काम ठोकला आहे. हिमनद्यांचा घोष कसा असतो, त्यांचा जन्म कसा होतो हे सतरा हजार फूट उंचीवर, हाडे गोठवणाऱ्या थंडीत जवळून जाणून घेतले आहे. माझ्या गावची–रायगड जिल्ह्यातील पोलादपूरची सावित्री तर माझ्यातून कायम सळसळत असते. माझ्यातील चैतन्य जागे ठेवत असते! महाराष्ट्रातील इतर नद्यांच्या तुलनेत जलदगतीने वाहत समुद्राला मिळणारी, एकशे दहा किलोमीटर लांबीची ही लहानात लहान पश्चिमवाहिनी नदी! तिचे माहात्म्य आणि पुराणातील तिचा ‘क्रांतिकारी स्वभाव’ लक्षात घेता ती चांगली नावारूपाला यायला हवी होती. तिची परिक्रमासुद्धा लोकप्रिय ठरू शकली असती. पण ते बाजूला राहिले, उलट तिच्यावर इतके अत्याचार होत राहिले की तेवढे देशातील कोणत्याही नदीवर झाले नसतील! आजही तिच्यातून होणारा वाळूचा उपसा, तिच्यात सोडले जाणारे सांडपाणी, विषारी पाणी तिची विटंबना करीत असते. महाडजवळ जेथे सावित्री खाडीला मिळते. त्या भागातील तिचे रक्तासारखे लाल, मृतप्राय पाणी पाहताना जीव गलबलून येतो. (अलीकडे सगळ्याच नद्यांची कर्मकहाणी थोड्या फार फरकाने अशीच आहे)
मी जेव्हा जेव्हा पोलादपूरला जातो आणि सावित्रीच्या काठावर बसून तिच्या पाण्यात हात घालतो तेव्हा तेव्हा तेथील मासे धावत येतात आणि माझ्याशी जणू हस्तांदोलन करू लागतात. क्षणभर अविश्वसनीय वाटणारा हा अनुभव मला नेहमी रोमांचित करून टाकतो. किनारे फुलवत-फळवत मधल्या धारेने झुळझुळत राहणे हा नद्यांचा धर्म! दुःख, समस्या, अडचणी किनाऱ्यावर फेकून देत आपणही निर्मळपणे वाहत राहिले पाहिजे; अशी प्रेरणा त्या माणसाला देत असतात. कधीतरी लक्षात येते की, वाहत जाणे सोपे पण प्रवाहाच्या विरोधात पोहणे अवघड! जगण्याची खरी कसोटी लागते ती प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात. मासे आयुष्यभर तोच नाद करत असतात पण हे माणसाच्या लक्षात येत नाही तो कष्टाची दिशा टाळून उताराच्या दिशेने वाहत जाण्यात धन्यता मानतो!
गर्दीत माणूस हिंसक होतो असे जे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे. नद्याही नागरी परिसरात शिरल्या की अस्वस्थ होतात, संतापतात. मोठमोठी शहरे आणि पुण्यक्षेत्री त्यांची सर्वाधिक विटंबना होताना दिसते. त्यांचा मार्ग बदलून त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणाचा राग त्या कधीतरी बाहेर उपसून काढतात. आपले जुने मार्ग बरोबर शोधून काढतात. हाहाकार उडतो पण माणूस शहाणा होत नाही. नद्यांवर केवळ कथा, कविता, कादंबऱ्या लिहीत बसण्यापेक्षा त्यांच्या दुर्दशेच्या विरोधात उभे राहणे ही काळाची गरज ठरली आहे. आपण काही न करता गप्प बसून राहिलो तर तेही त्यांच्या लक्षात येते. संतापलेल्या नद्या अनेकदा माणसाला त्याची जागा दाखवतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकतात. त्यांनी केलेल्या उत्पाताची अनेक उदाहरणे दरवर्षी समोर येत असतात. माणूस फक्त ती उदाहरणे माणूस एकमेकांना सांगत बसतो. त्यातच धन्यता मानतो. नद्यांच्या परिसरात फिरले की माणूस उन्नत भावावस्थेत जातो, त्याच्यातील प्रेमळपणा, माणुसकी जागी होते. प्राचीन नद्यांच्या परिसरात तर त्याच्या हातातील दगडाचे कसे आणि किती वेगाने फूल होते; पण ते त्याच्याही लक्षात येत नाही. तो तसाच मागील पानावरून पुढील पानावर आणि एका वर्षातून दुसऱ्या वर्षाकडे निर्विकारपणे सरकत राहतो!






