नाटकवेडा माणूस!

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ


माझ्या घरी संध्याकाळी जेवायला पाहुणे येणार होते. आज संध्याकाळी बागेत फेरफटका मारता येणार नाही, असे वाटत असतानाच अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झालेला होता. म्हणून अर्धा तास का होईना जवळच्या बागेत फिरायला जायचा निर्णय घेतला, जो चांगलाच पथ्यावर पडला. म्हणजेच झाले काय की नेहमी बागेत गेल्यावर फिरायला येणाऱ्या मैत्रिणी सोबतीने चालतात. तिथे येणाऱ्या पंधरा-सोळा मैत्रिणींपैकी कोणी ना कोणीतरी सोबत असतेच. मग काय त्याच त्याच गप्पा, खाणे-पिणे आणि मुले-बाळे. तरी अस्वस्थता होतीच की आपण तासभर लवकर आल्यामुळे या सगळ्या भेटणार नाहीत आणि शिवाय एकटीलाच फिरावे लागेल म्हणून...! पण बागेत शिरतानाच आमच्या सोसायटीतील शंकर एम. माझ्या सोबतीने बागेत शिरले. खरे तर खूप दिवसांनी भेटले होते. त्यामुळे मीही त्यांच्या चालीने (म्हणजे ते हळू चालत होते) चालू लागले. पंच्याहत्तरीच्या आसपासचे हे गृहस्थ वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू लागले. त्यांनी मला अचानक विचारले, ‘अलीकडे कोणतं नाटक पाहिलं?


होय, पण मी तुम्हाला सांगायचे विसरले की ते तमिळ भाषिक असूनही अतिउत्कृष्ट मराठी बोलायचे. मी क्षणभर विचार करू लागले आणि मला खरंच काही आठवेचना... शेवटचे नाटक मी कोणते आणि कधी पाहिले? मग मीच त्यांना प्रतिप्रश्न केला, “तुम्ही कोणतं नाटक पाहिलं?” अगदी सहजतेने ते उत्तरले,
“श्श… घाबरायचं नाही.”
‘श्श’चा त्यांनी केलेला उच्चार कौतुकास्पद होता. मी विचारले, “अशा नावाचं नाटक आहे?”
“आहे ना आम्ही बघून आलो. त्यात डाॅ. गिरीश ओक यांनी काम केलेलं आहे.”
“वाह, काय सांगताय?”
“मग कसलं भन्नाट नाटक आहे. त्याचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे... अफलातून...!”
“बापरे... तुम्ही फक्त नाटक पाहत नाही तर या पण गोष्टी पाहता का?”
“होय म्हणजे काय रत्नाकर मतकरी माझे आवडते लेखक आहेत त्यांच्या गूढ कथेवरील हे नाटक!”
मलाच ‘श्श’ केल्यासारखं त्यांनी जणू गप्प करून टाकले आणि ‘घाबरायचं नाही’ असं नाटकाचे नाव असले तरी मी मात्र आपल्याकडे काहीच नसलेल्या ज्ञानामुळे प्रचंड घाबरले. शंकर एम. यांच्या लक्षात काही आले नाही. ते एका वेगळ्याच विश्वात गेलेले होते. त्यांनी मला विचारले,
“डॉ. वसंतराव देशपांडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात भूमिका केलेली ज्याचे कमीत कमी पाच प्रयोग मी पाहिले.”
“क्काय...?”
मी चित्कारले.“त्यांची ‘खानसाहेब’ची भूमिका प्रचंड गाजली. सगळी लोकप्रियता मिळलेली नाटकं तर मी पाहिलीच आहेत; परंतु नवीन आलेलं नाटक मी सोडत नाही.”
“म्हणजे?” माझा बावळट प्रश्न.
“म्हणजे असं की महिन्याला कमीत कमी तीन नाटकं तरी मी पाहतोच.”
“कुठे जाऊन पाहता?”
“शिवाजी मंदिर, साहित्य संघ, विष्णुदास भावे... अगदी पार्ला- बोरिवलीपर्यंत मी जातो.”
बीआरसीतून सायंटिफिक ऑफिसर होऊन निवृत्त झालेले शंकर एम. माझ्यासारख्या मराठी माणसाला, मराठी नाटकाविषयीची माहिती देत होते आणि या संभाषणाचे विशेष म्हणजे ती माहिती माझ्या ज्ञानात भर घालत होती.
“वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आलेला होता. ‘वसंतराव’ माझ्या आवडते म्हणून मी मुद्दाम जाऊन पाहिला. या चित्रपटात त्यांच्या नातवाने म्हणजे राहुल देशपांडे यांनी वसंतराव साकारला आहेत.”
मी फक्त “हो का?”, “असं का?”, असे म्हणत राहिले.
‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘रमेश भाटकर’, ‘प्रशांत दामले’, ‘दिलीप प्रभावळकर’, ‘सुलभा देशपांडे’, ‘अलका कुबल’ इत्यादींच्या गाजलेल्या भूमिका, त्यांच्या नाटकांची नावे, त्या नाटकांचे नेपथ्य, त्या नाटकांचे लेखक....इ. काही काहीही विचारा, इतके त्यांना ज्ञान!
खरंतर बागेत जाऊन दोन फेऱ्या मारून मी घरी परतणार होते. त्यांच्याशी बोलता बोलता नऊ फेऱ्या मारल्या. घरी पाहुणे यायचे होते म्हणून नाईलाजाने घरी परतले. स्वयंपाकघरात शिरले ते रात्री उशिरापर्यंत कामात होते. रात्रीचा १ वाजला होता तेव्हा बिछान्यावर पडले आणि मोबाईल हातात घेऊन गुगल गुरूला विचारले- मुंबईत चालू असलेले मराठी नाटक कोणते?
गुगल गुरूने काय उत्तर दिले, हे महत्त्वाचे नाही; परंतु हे महत्त्वाचे आहे की एक मराठी माणूस म्हणून मी कमीत कमी महिन्यातून एक तरी मराठी नाटक पाहिले पाहिजे, असा निश्चय करूनच त्यादिवशी झोपले!
मग माझ्यासारखा निर्णय घेऊन, तुम्ही कधी आपला निर्णय अमलात आणताय? चला... आपण सोबतीनेच मराठी नाटक पाहूया!

Comments
Add Comment

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा शब्दांवर साऱ्यांची मालकी तीन अक्षरी शब्दांची ही ‘की’ची करामत बोलकी दाराची बहीण कोण तिला

संधिप्रकाश कसा पडतो?

सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका

राक्षस आणि राजू

कथा,रमेश तांबे राजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या.

चांगले तेवढे घ्यावे

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर  ‘चांगले तेवढे घ्यावे’ ही म्हण आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

शारदाश्रम विद्यामंदिर

तांत्रिक विद्यालय व शास्त्र - व्यावसायिक आिण उच्च माध्यमिक - व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय SHARADASHRAM VIDYAMANDIR Technical High School &

स्वतःला प्राधान्य द्या...

मनस्वीनी,पूर्णिमा शिंदे  स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या