सर्वच पदे वरळीत देणार, तर मग इतरांनी काय करायचे?
मुंबई : उबाठाच्या महापालिका गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड केल्यानंतर आता पक्षातून नाराजीचे सूर उमटू लागले. किशोरी पेडणेकर या माजी महापौर असल्याने त्यांची निवड गटनेतेपदी केली असली तरी प्रत्यक्षात त्या ज्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात, तो प्रभाग वरळी विधानसभेचा आहे. वरळीचे आमदार हे आदित्य ठाकरे असल्यामुळे त्यांनी आधी त्यांना महापौरपद दिले आणि गटनेतेपद दिल्यामुळे ही नाराजी अधिक वाढल्याचे पहायला मिळते. जर सर्वच पदे वरळी विधानसभेत वाटली जाणार असतील तर आमचा उपयोग काय अशाप्रकारची भावना नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण होवू लागली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उबाठा आणि मनसेने युतीमध्ये निवडणूक लढली आणि या निवडणुकीत उबाठाचे ६५ आणि मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोकण भवनमध्ये नगरसेवकांची नोंदणी करतानाच उबाठाने गटनेता म्हणून माजी महापौर पेडणेकर यांची निवड केली. त्यामुळे पेडणेकर या गटनेत्या म्हणून घोषित झाल्यामुळे विरोधी पक्षात बसल्यास त्याची नेमणूक विरोधी पक्षनेतेपदी होणार आहे. त्यामुळे पेडणेकर यांची निवड विरोधी पक्षनेतेपदी केल्यामुळे पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्येच नाराजीचा सुर आहे. पेडणेकर या वरळी विधानसभेतील असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांची नेमणूक गटनेतेपदी करून पुढे त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी टाकली का असा प्रश्न उबाठाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांना पडू लागला. महापौरपद देतानाही आदित्य ठाकरे यांनी पेडणेकर यांना झुकते माप दिले होते. यापूर्वी विधान परिषदेतील सदस्याकरता सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोन आमदारांची वर्णी लावली. तसेच नुकत्याच झालेल्या मपा. निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४ची उमेदवारी ही आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत यांनाही दिली.
त्यामुळे आदित्य ठाकरे वरळी सुरक्षित राखण्यासाठी अशी खेळी करत असल्याने इतर ठिकाणी काही निष्ठावान उबाठा सैनिक नाही का? असा सवाल व्यक्त केला जात आहे. पेडणेकर यांच्यावर कोविड काळातील घोटाळे तसेच भ्रष्टाचारासंदर्भात भाजपकडून आरोप तसेच टीका केली जाते. त्यामुळे भविष्यात या पदावर राहून त्यांना सभागृहाचे कामकाज करताना अनंत अडचणी येऊ शकतात, याची कल्पना असूनही पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकल्याने उबाठाच्या सैनिकांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






