चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंत
हरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो. मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर शिक्षणाचा भार टाकला जातो. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. १ ते ५० अंक लिहिता आले नाहीत म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत चार वर्षीय मुलीचा दुःखद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.
फरीदाबादच्या सेक्टर ५८ मधील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी कृष्णा जयस्वाल (३१) याला अटक करण्यात आली आहे. शहरातील न्यायालयात त्याला हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खेरतिया गावचा रहिवासी असलेला जयस्वाल आपल्या कुटुंबासह फरीदाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, जयस्वाल आणि त्यांची पत्नी दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. आई दिवसा कामावर जायची. तर जयस्वाल रात्रपाळी करायचा दरम्यान दिवसा मुलांची काळजी घेणे आणि त्यांचा अभ्यास करून घेण्याचे काम जयस्वाल करत असे.सदर घटना २१ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, जयस्वालने मुलीला एक ते ५० पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र मुलीला अंक लिहिता आले नाहीत. त्यामुळे जयस्वालने मुलीला जबर मारहाण केली. लाटण्याने मारून मुलीला भिंतीवर आपटल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण केल्यानंतर आरोपी वडील तिला रुग्णालयात घेऊन गेला. त्याने त्याची पत्नी रंजिताला सांगितले की, मुलगी खेळताना पायऱ्यांवरून खाली पडली. मात्र घटनेच्या वेळी त्याचा सात वर्षांचा मुलगा घरीच होता. त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि वडिलांच्या कृत्याची माहिती उघड झाली. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्यानंतर पत्नी रंजिताने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयालाही हीच बाब आरोपी वडिलांनी सांगितली होती.






