२४ तासांत २६ विमाने, ६ युद्धनौकांची घुसखोरी
बीजिंग : जगाच्या पाठीवर आधीच रशिया–युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष सुरू असताना, आता आशिया खंडातही युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, चीनने तैवानभोवती लष्करी हालचाली अधिक तीव्र केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या २४ तासांत चीनच्या २६ लष्करी विमानांनी आणि ६ नौदल जहाजांनी तैवानच्या परिसरात घुसखोरी केली.
१८ चिनी विमानांनी तैवान सामुद्रधुनीतील ‘मध्यरेषा’ओलांडली. ही रेषा चीन आणि तैवानमधील अनधिकृत सीमारेषा मानली जाते. या विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य भागातील हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केल्याने तैवानच्या संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. या घुसखोरीत लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि गुप्तचर विमानांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
चीनच्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देत तैवानने आपली लष्करी सज्जता वाढवली आहे. तैवानच्या हवाई दलाची लढाऊ विमाने तातडीने हवेत तैनात करण्यात आली असून, किनाऱ्यावरील क्षेपणास्त्र प्रणाली ‘रेडी टू फायर’ मोडमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून कोणत्याही संभाव्य धोक्याला त्वरित उत्तर देण्याची तयारी आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम, भारतही सतर्क
तैवान सामुद्रधुनीत युद्ध भडकले, तर त्याचा जागतिक व्यापार आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण जगातील मोठा सेमीकंडक्टर उत्पादन हिस्सा तैवानमध्ये आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग आणि संरक्षण क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो. भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती लष्करी उपस्थिती आणि सागरी मार्गांवरील दबाव भारताच्या सागरी व्यापारासाठीही चिंतेचा विषय ठरू शकतो. एकूणच, चीन–तैवान तणाव नव्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत असून, आशिया खंडात नव्या संघर्षाची शक्यता जगासाठी गंभीर इशारा ठरत आहे.






