नांदेड : शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित ‘हिंद दि चादर’ कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड येथे होणार होते. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण नेमके काय कारण आहे हे अद्याप समजलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर येणार असल्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली होती. संपूर्ण नांदेडमध्ये तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त होता. भाजपच्या नांदेडमधील कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह होता. पण कार्यक्रमाच्या काही तास आधीच अमित शहांचा दौरा रद्द झाला. अमित शहा यांचा दौरा रद्द झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
नांदेड महापालिका निवडणूक निकाल २०२६
राज्यातील नांदेडसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाले. नांदेड महापालिकेत वीस वॉर्डातील ८१ जागांसाठी निवडणूक झाली आणि भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेनेचा चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला. काँग्रेस दहा जागा जिंकू शकली. तर इतर पक्षांचा २० जागांवर विजय झाला.






