Sunday, January 25, 2026

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय नोंदवला आहे. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने केवळ १० षटकांत विजयाचे लक्ष्य गाठून मालिका आपल्या नावावर केली. भारताने या सामन्यात पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाचा ८ वर्ष जुना जागतिक विक्रमही मोडीत काढला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या (३ विकेट्स) भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. ग्लेन फिलिप्स (४८) आणि मार्क चॅपमन (३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्या आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला ९ बाद १५३ धावांवर रोखले. १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर इशान किशन (२८ धावा, १३ चेंडू) आणि अभिषेक शर्मा यांनी १९ चेंडूंत ५३ धावांची वेगवान भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या साथीने केवळ ४० चेंडूंत १०२ धावांची नाबाद भागीदारी केली.

भारताने पहिल्या ६ षटकांत २ बाद ९४ धावा कुटल्या. ही भारताची पॉवरप्लेमधील दुसरी सर्वोत्तम आणि न्यूझीलंडविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने २०१८ मधील ऑकलंड येथे ऑस्ट्रेलियाने केलेल्या ९१ धावांचा विक्रम मोडला. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आपली वादळी अर्धशतके पूर्ण करत १० व्या षटकांतच भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या या 'विराट' विजयामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून भारतीय युवा संघाच्या या आक्रमक शैलीचे जगभर कौतुक होत आहे. रोहित शर्माचा मोडला विक्रम

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिसरा षटकार मारताच रोहित शर्माचा मोठा विक्रमही मोडीत काढला. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक १० षटकारांचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे होता. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ८ षटकार मारले होते. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे टाकत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सिक्सर किंग होण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Comments
Add Comment