Sunday, January 25, 2026

दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख

दीड तासांच्या उपचारांसाठी १.६५ लाख

न्यूयॉर्क : अमेरिकेतील आरोग्यसेवेचे विदारक वास्तव दाखवणारी एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीला अवघ्या दीड तासांच्या रुग्णालयातील उपचारांसाठी तब्बल १,८०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.६५ लाख रुपयांचे बिल भरावे लागले, तेही चांगला मेडिकल इन्शुरन्स असतानाही.

संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या दिवशी कुटुंबासोबत आईस स्केटिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. तीव्र वेदना होत असल्याने आणि फ्रॅक्चरची शंका आल्याने तो रुग्णालयात गेला. इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टरांनी तपासणी करून एक्स-रे काढला आणि गुडघ्याभोवती क्रेप बँडेज बांधली. संपूर्ण प्रक्रिया सुमारे दीड तासात पूर्ण झाली.

तीन आठवड्यांनंतर इन्शुरन्स कंपनीने कळवले की, एकूण वैद्यकीय बिलापैकी १,८०० डॉलर्स रुग्णाला स्वतः भरावे लागतील, तर उर्वरित ६,३५४ डॉलर्स इन्शुरन्सद्वारे भरले जातील.

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी अमेरिकेच्या महागड्या आरोग्य व्यवस्थेवर टीका करत भारत व कॅनडातील तुलनेने परवडणाऱ्या आरोग्यसेवेशी तुलना केली. अमेरिकेत बहुतांश नागरिकांना खासगी किंवा सरकारी इन्शुरन्सच्या माध्यमातून उपचार मिळतात. मात्र तरीही किरकोळ दुखापतींसाठीही मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो, ही बाब या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment