मुंबई : मुंबईच्या वडाळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्बन कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला मसाज थेरपिस्टने बुकिंग रद्द झाल्यानंतर ग्राहक महिलेवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय महिला आपल्या मुलासोबत वडाळा परिसरात राहते. खांद्याच्या दुखापतीसाठी तिने अर्बन कंपनीच्या अॅपवरून मसाज सेवा बुक केली होती. ठरलेल्या वेळेत थेरपिस्ट तिच्या घरी पोहोचली. मात्र तिचे वर्तन आणि सोबत आणलेल्या मसाज बेडमुळे ग्राहक अस्वस्थ झाली. त्यामुळे तिने सेवा रद्द करण्याचा निर्णय घेत परताव्याची प्रक्रिया सुरू केली.
हे कळताच संबंधित थेरपिस्ट संतप्त झाली. वाद वाढत गेल्यानंतर तिने शिवीगाळ करत थेट शारीरिक हल्ला केला. पीडितेचे केस ओढणे, मारहाण करणे, ओरबाडणे आणि ढकलणे असे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेचा मुलगा मध्ये पडताच त्यालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे समोर आले आहे.
घटनेदरम्यान पीडितेने तात्काळ पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी थेरपिस्ट तेथून पसार झाली होती. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
तपासात असेही स्पष्ट झाले आहे की सुरुवातीला अॅपवर थेरपिस्टच्या ओळखीबाबत तांत्रिक गोंधळ होता, जो नंतर दुरुस्त करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसून येत असून त्यामुळे प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
या घटनेनंतर अर्बन कंपनीने संबंधित थेरपिस्टला कामावरून काढून टाकल्याची माहिती आहे. मात्र कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पीडित महिलेने न्यायाची अपेक्षा व्यक्त केली असून, या घटनेमुळे ती मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात असल्याचे सांगितले आहे.