विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. बेकायदेशीर शाळेच्या महिला सहाय्यक नसलेल्या व्हॅनमध्ये एका चिमुकलीचा विनयभंग झाला.
साधारण दीड वर्षांत घडलेल्या दुसऱ्या विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. या प्रकराची माहिती बातम्यांमध्ये काल आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली. बदलापूरमध्ये साधारण वर्ष - सव्वा वर्षापूर्वी शाळकरी मुलीच्या विनयभंगाचा दुर्दैवी प्रकार घडला होता. शाळेतल्या शिपायाकडूनच विनयभंगाचा प्रकार झाल्याने आणि शाळा प्रतिष्ठित, ख्यातनाम असल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास हयगय चालवली, तेव्हां बदलापूरकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे रुळावर उतरून आपल्या भावनांना वाट करून दिली होती. त्या उद्रेकाने सगळ्या यंत्रणा वठणीवर आल्या होत्या. त्या विनयभंग प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनंतर पोलिसांच्या गाडीत झालेल्या चकमकीत मारला गेला. त्या संपूर्ण प्रकरणाची आठवण महाराष्ट्राला काल पुन्हा एकदा झाली. गेल्या प्रकरणात शाळकरी मुलगी होती. यावेळी पूर्वप्राथमिक शाळेत, म्हणजे बालवाडीत जाणारी अवघी चार वर्षांची चिमुकली आहे. गेल्यावेळी शाळेतला शिपाई होता; यावेळी मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या खासगी व्हॅनचा चालक आहे. म्हणजे, ज्यांची व्यवस्था मुलांच्या सहाय्यासाठी आणि संरक्षणासाठी केली आहे, तेच दोन्ही प्रकरणात आरोपी आहेत! अशावेळी विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न हतबल पालकांसमोर उभा ठाकल्याशिवाय राहात नाही. दोन्ही घटना बदलापुरात घडल्याने हा प्रश्न केवळ बदलापूरपुरता सीमित आहे, असा गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. याची व्याप्ती पूर्ण देशभर आहे. महाराष्ट्राने; निदान महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आणि पोलीस महासंचालकांनी तरी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. अशा घटना घडू नयेत यासाठी कडक प्रतिबंधात्मक व्यवस्था केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या महानगरी, शहरी, निमशहरी, ग्रामीण-अशा सर्व ठिकाणी समान पद्धतीने लागू करता येईल, अशीच ही उपाययोजना असायला हवी. बदलापूरला आता महिला नगराध्यक्ष असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर या प्रश्नाच्या खोलात जाऊन संबंधित यंत्रणांना उपाययोजनांसाठी मदतही केली पाहिजे. कारण, या शहराची इभ्रत राखण्याची सगळ्यात पहिली जबाबदारी त्यांची आहे!
बदलापुरात अगदी कमी अंतराने दोन घटना घडल्या आणि पहिल्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गहाळपणा केला, अन्यथा बदलापूरचं नांव एवढं चर्चेत येण्याचं काही कारण नव्हतं. अशाच घटना यापूर्वी मुंबईत, उच्चभ्रूंच्या मानल्या जाणाऱ्या शाळेतही घडल्या आहेत. त्या प्रकारानंतर शाळेच्या बस आणि शाळेने नेमलेल्या खासगी कंत्राटदारांच्या बस याबाबत बरीच चर्चा झाली होती. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अशा बसमध्ये एक महिला सहाय्यक असावी, मुलांना बसमध्ये घेण्याची आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना बसमधून पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी या महिला सहाय्यकावर सोपवावी, असा तोडगा निघाला होता. त्याची अंमलबजावणीही झाली होती. मुंबईत घडलेल्या त्या घटनेचे पडसाद इतके तीव्र होते, की बसच काय; मुलांची शाळेसाठी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्येही महिला सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली होती. पण, नंतर आपल्याकडे जे घडतं, तेच झालं. काळ लोटला. प्रकरणाचं गांभीर्य कमी झालं. नवं शालेय वर्ष सुरू झालं. व्हॅनमधल्या महिला सहाय्यक गायब झाल्या आणि परवाचा प्रकार घडला! या बालिकांच्याबाबतच नाही, जगात कुठेही महिलांच्या विनयभंगाचे प्रकार घडले, अत्याचाराच्या घटना घडल्या, तर त्यातल्या बहुतांश घटनांमध्ये पुरुष नातेवाईक किंवा परिचितांपैकीच कोणीतरी आरोपी असतात, अशी सिद्ध झालेली आकडेवारी आहे. बदलापूरच्या पूर्वीच्या घटनेतला आरोपी शाळेचा शिपाई होता. परवा घडलेल्या आणि मुंबईतल्याही अलीकडच्या घटनेतले आरोपी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या गाड्यांचे चालक होते. परवाच्या घटनेच्या तपशिलात पाहिलं, तर व्हॅन नेहमी बालिकेला घेऊन ज्या वेळेला येते, त्यापेक्षा बराच उशीर झाल्याने पालकांनी चौकशी केली, तेव्हा त्यानंतर पाऊण तासाने व्हॅन पोहोचली. परतलेल्या बालिकेचं वर्तन पालकांना खटकल्याने त्यांनी जेव्हा खोदून खोदून चौकशी केली, तेव्हा आक्षेपार्ह प्रकार उघडकीस आला. चालकाला शाळेत बोलावलं, तेव्हा बालिका घाबरून पालकांमागे लपली. झाल्या प्रकाराला त्यातून दुजोरा मिळाला, असं समजतं. हा संपूर्ण प्रकारच अत्यंत किळसवाणा आहे.
इतक्या छोट्या मुलींचा विनयभंग होईल, असं दुष्कृत्य करावंसं संबंधित पुरुषांना का वाटत असेल? त्यांच्या मनात असं अभद्र कशातून उगवत असेल? शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ या प्रकारांसाठी पहिले दोषी ठरवतात, ते मोबाईलमधून २४ तास स्त्रवत असलेल्या हिंसक, लैंगिक, भावना उद्दीपित करणाऱ्या 'मनोरंजना'च्या तथाकथित कार्यक्रमांना. या कार्यक्रमांतून; छोट्या छोट्या रीलमधूनही जे पोहोचतं, त्यातून अशा आक्षेपार्ह बाबींबाबतचं गांभीर्य, धाक संपून जातो. नैतिकतेचे सारे संस्कार गळून पडतात. असा एखादा कार्यक्रम किंवा रील पाहिल्या, तरी तुमच्या मोबाईलवर त्याच प्रकारचे कार्यक्रम, रील किंवा मनोरंजनाच्या तत्सम प्रकारांची रांग लागते. पाहणारा एकामागून एकात गुंतत जातो. त्यातून सगळं जग अशा विकृत प्रकारांनीच भरलं असल्याचा भास त्याला होतो. जे 'खासकरून' बनवलेलं असतं, तेच त्याला 'सर्वसाधारण' वाटू लागतं. त्यातून हे प्रकार वाढीस लागतात. साहजिकच प्रौढांपेक्षा तरुणांमध्ये, कुटुंबापासून लांब असलेल्या किंवा निवासाच्या अपुऱ्या सोयी असलेल्यांमध्ये हे प्रकार अधिक आहेत. बदलापूरमध्ये घडलेल्या दुर्घटना उघडकीस आल्या, त्याची दखल पालकांनी घेतली, प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचा आग्रह धरला म्हणून; अन्यथा मुंबई आणि मुंबईलगत पसरलेल्या अक्राळविक्राळ वस्त्यांचा नुसता अंदाज घेतला, तरी त्यात असे असंख्य प्रकार आढळतील. अगदी लहान मुलांमध्ये (केवळ मुलींनानव्हे!), शाळेच्या शिक्षकवृंदासह सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, सहाय्यक ज्या स्तरातून येतात, त्या स्तरांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांमध्ये मुली-महिलांवरील अशा विनयभंग, जोर-जबरदस्तीच्या प्रकरणांबाबतची संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अशी संवेदनशीलता वाढवणं, ही जागृतीनंतरची पुढची पायरी आहे. समाजमाध्यमांतून वाहत असलेल्या, अतिरंजित, विकृत 'मनोरंजना'चं काय करायचं, हा जगातल्या सगळ्याच सरकार आणि समाजधुरिणांसमोरचा प्रश्न आहे. हा 'जागतिक प्रश्न' जेवढ्या लवकर सुटेल, तेवढे पुनःपुन्हा 'बदलापूर' होण्यापासून वाचेल!






