महाराष्ट्रात जिथे राजकीय निवडणुकांची चाहूल नाही, तिथे विदर्भात मात्र एका वेगळ्याच ‘निवडणुकीची’ धडधड सुरू झाली आहे ती राजकारणाची नव्हे, तर साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठाची! जवळपास तीन दशकांनंतर विदर्भ साहित्य संघात खरी लोकशाही पाहायला मिळत असून, पंचवार्षिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाच्या रिंगणात तब्बल अकरा उमेदवार उतरल्याने साहित्य वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.
वार्तापत्र विदर्भ अविनाश पाठक
महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. मात्र त्यात विदर्भात एकही जिल्हा नाही. तरीही विदर्भात या आठवड्यात निवडणुकांचे वातावरण तापते आहे, मात्र ते फक्त साहित्य वर्तुळात.
होय... विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. मधली जवळजवळ तीस वर्षे विदर्भ साहित्य संघात निवडणुका फक्त एकतर्फीच होत होत्या. कारण तिथे एकाच नेतृत्वाची अशी काही दहशत होते की दुसरा कोणीही मैदानात उतरण्याची हिंमत करत नसे. मात्र ही दहशत संपल्यामुळे यावेळी साहित्य संघात खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झाली आहे की काय असे वाटू लागले आहे. कारण पंचवार्षिक निवडणुका जाहीर होताच अध्यक्षपदासाठी एक-दोन नाही, तर चक्क ११ जण मैदानात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकांचे वातावरण आता चांगलेच तापलेले आहे.
विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील सर्वात जुनी सक्रिय अशी संघटना राहिलेली आहे. या संघटनेला नुकतीच १०२ वर्षे झाली असून अनेक मान्यवर मराठी सारस्वतांनी या संघटनेचे नेतृत्व केलेले आहे. त्यात प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. मधुकर आष्टीकर, प्रा. सुरेश द्वादशीवार, ग. त्र्यं.माडखोलकर, डॉ. वि. भि. कोलते, कवी अनिल अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आज या संस्थेचे जवळजवळ ९ हजार आजीवन सदस्य असून या संघटनेने एका काळात विदर्भाचे सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्र चांगलेच गाजवलेले आहे. नागपुरात भरवस्तीत एका काळात त्यांचे सुसज्ज असे नाट्यमंदिर धनवटे रंगमंदिर म्हणून प्रसिद्ध होते. तिथे अनेक गाजलेली नाटके होत असत. त्याशिवाय अनेक गाजलेले कार्यक्रम देखील झालेले आहेत. कित्येक संगीताच्या मैफलींनी इथे रात्रही जागवलेली आहे.
मात्र मधल्या काळात या विदर्भ साहित्य संघाची भर वस्तीतील इमारत पुनर्विकासाच्या नावाखाली घराशयी केली गेली. त्याला तीन दशके लोटलेली आहे त्यानंतर तिथे अजूनही नवे रंगमंदिर उभे होऊ शकलेले नाही. मात्र तिथे निर्माण केलेल्या दहशतीमुळे ज्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना साहित्य संघातून बाहेर केले गेलेले आहे.
मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळेच यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला ११ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत, तर कार्यकारिणी सदस्यांसाठी १११ अर्ज आलेले आहेत. अध्यक्षपदासाठी आलेल्या अकरा अर्जांपैकी नऊ अर्ज हे साहित्यिक आणि नाट्यकर्मी मंडळींचे आहेत. एक अर्ज विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांचा आहे, तर एक अर्ज आपणच विदर्भाचे सांस्कृतिक नेते आहोत असे प्रस्थापित करू बघणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांचाही आहे. डॉ. गिरीश गांधींच्या उमेदवारीमुळे साहित्य वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या कानावर येत आहेत. डॉ. गिरीश गांधी हे मूळचे काँग्रेसचे नेते, आधी ते काँग्रेसमध्येच टी. जी. देशमुख यांसोबत होते. मग त्यांनी शंकरराव चव्हाण यांना जवळ केले होते. नंतर त्यांनी शरद पवारांशी जुळवून घेतले आणि त्यातून वर्षभराची आमदारकी देखील मिळवली होती. नंतर मात्र त्यांना पुढे काहीच मिळाले नाही. मात्र सर्वपक्षीय नेत्यांशी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी जुळवून घेऊन सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात लुडबुड करणे हा त्यांचा आवडीचा उद्योग आहे. त्यातूनच ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही जवळ सरकलेले आहेत. गडकरींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ते हौसेने करत असतात. विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हा साहित्यिक असावा असे अपेक्षित आहे. मात्र गिरीश गांधी यांचा साहित्याशी काही संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी लिहिलेला एकही लेख किंवा कथा किंवा कविता कोणाच्याही वाचण्यात आल्याचे ऐकलेले नाही. तरीही त्यांनी साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून साहित्य संघाचे प्रशासन सुरळीतपणे चालावे यासाठी आपण अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर आपण नितीन गडकरींचेच उमेदवार आहोत असेही ते भासवू बघत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे नितीन गडकरींना आता साहित्य संघावर ताबा मिळवायचा आहे अशीही चर्चा साहित्य वर्तुळात सुरू झाली आहे. वस्तूतः गडकरींना तसे करण्याची गरज वाटत नाही. अशाप्रकारे संस्था ताब्यात घेण्याचा गडकरींचा स्वभाव देखील नाही. काही साहित्यप्रेमी त्यांच्याशी बोलले असता तिथले तुम्ही बघा तिथे कोणीही अध्यक्ष आला तरी मला फरक पडत नाही असे त्यांनी सांगितल्याचे बोलले गेले आहे. तरीही जर गांधी आपणच गडकरींचे उमेदवार असे प्रोजेक्ट करणार असतील, तर त्यामुळे नितीन गडकरींबद्दलच गैरसमज वाढू शकतात. म्हणूनच या प्रकारात आता नितीन गडकरींनीच खुलासा करावा अशी अपेक्षा साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र गिरीश गांधी यांनी साहित्य संघात निवडणूक कशाला घ्यायची अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र बसावे आणि त्यातून सहमतीने कार्यकारिणी निवडावी अशी सूचना केली आहे. तिथेही त्यांनी नितीन गडकरी यांना मध्यस्थी करायला लावावी आणि त्यांच्या सहमतीने कार्यकारिणी बनवावी असेही सुचवले आहे. मात्र गडकरींना मध्ये का आणायचे असाही प्रश्न साहित्य वर्तुळात विचारला जातो आहे. गडकरींना जर मध्ये आणले तर गिरीश गांधी आपले संबंध वापरून स्वतःलाच अध्यक्ष करून घेतील असाही सूर निघतो.
दुसरे असे की, गिरीश गांधी हे मराठी भाषिक नाहीत. त्यामुळे अमराठी व्यक्तीला साहित्य संघाचे नेतृत्व का द्यायचे असाही प्रश्न निर्माण होतो आहे. अर्थात अमराठी असलेल्या अनेक साहित्यिकांनी मराठीत चांगले साहित्य निर्माण केले आहे. त्यात डॉ. यु. म. पठाण, रतनलाल सोनग्रा, पन्नालाल सुराणा, जवाहर मुथा, गिरीश जाखोटिया अशी नावे सांगता येतील. तसे गिरीश गांधींचे साहित्यात काहीही योगदान नाही. त्यामुळेच त्यांच्या नावाला साहित्यिक वर्तुळात चांगलाच विरोध असल्याचे बोलले जात आहे.
गिरीश गांधींव्यतिरिक्त साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, झाडीबोलीचे साहित्यिक लखन सिंह कटरे, नाट्यकर्मी रंजन दारव्हेकर, प्रमोद भुसारी असे दिग्गज मैदानात उतरलेले आहेत. या सर्वांचे साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निश्चितच मोलाचे योगदान आहे. शिवाय प्रशासनाचा देखील अनुभव आहे. त्यामुळे आता अध्यक्ष कोण होणार आणि कार्यकारिणीत कोण राहणार याकरिता साहित्य वर्तुळात आडाखे बांधणे सुरू आहे.
अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख काल संपली. आता ९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आजची परिस्थिती बघता यावेळी निवडणुका चांगल्याच होतील आणि त्या चांगल्या रंगतीलही असे चित्र दिसत आहे.