Saturday, January 24, 2026

नवनिर्वाचित नगरसेवकांची महापालिकेत वर्दळ

नवनिर्वाचित नगरसेवकांची महापालिकेत वर्दळ

प्रभागांमध्ये सुद्धा लागले कामाला

विरार : वसई-विरार महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होणार तेव्हा होणार, महापौर उपमहापौर निवडल्या जाणार तेव्हा निवडल्या जाणार मात्र निम्म्याहुन अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या गाठीभेटींचे सत्र सुरू केले आहे. प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अनेक नगरसेवक रस्त्यावर सुद्धा दिसत असल्याचे चित्र आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत ११५ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी काही चेहरे जुने असले तरी पहिल्याच वेळी निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे.

सर्वच नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आता महापौर, उपमहापौर निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या अानुषंगाने सत्तेच्या जवळ असलेल्या बहुजन विकास आघाडीने महापौर उपमहापौर निवडण्यासाठी पक्षांतर्गत बैठकाही सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा २८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केली जाणार आहे. तसेच विरोधी पक्षनेता आणि गटनेत्याचे नाव देखील लवकरच ठरविण्यात येणार आहे. दरम्यान , निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठवडा होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रभाग समिती कार्यालयामधील अधिकाऱ्यांचा परिचय करून घेणे आणि मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. महापालिकेच्या मुख्यालयात सुद्धा दररोज मोठ्या संख्येने नवनिर्वाचित नगरसेवक येतात आणि विविध विभागाचे प्रमुख, उपआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना आपला परिचय करून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे प्रभागातील विविध समस्यांबाबत या अधिकाऱ्यांची चर्चा देखील केल्या जात आहे. काही नगरसेवकांनी अगदी पहाटेपासून आपल्या प्रभागात फेरी मारायला सुरुवात केली आहे. कचऱ्याच्या समस्या आणि अन्य याबाबतची पडताळणी नगरसेवकांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment