विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास
कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील म्हाडा वसाहत एकतानगर, सुंदर नगर, श्रीजी नगर आणि ब्लू ट्युलीप वस्तीच्या मधोमध असलेल्या मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्यावरील भेगा भरण्यासाठी ठेकेदाराने थेट न्यू लिंक रोडवर डांबराची भट्टी लावून ड्रम उकळवल्याने सकाळी सुमारे १० वाजता परिसरात विषारी धुराचे लोट पसरले. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना खोकला, श्वसनाचा त्रास तसेच डोळ्यांची जळजळ सहन करावी लागली. धुरामुळे काही काळ अंधाराचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत भट्टी बंद पाडली. मात्र तोपर्यंत संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला होता. नागरिकांनी दोषींवर तत्काळ व कठोर कारवाईची मागणी केली असून, पालिका प्रशासनाने भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आरसीसी रस्त्यांच्या भेगा भरण्यासाठी डांबर गरम करताना बंद व वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक असते. मात्र महानगरपालिकेचे काही ठेकेदार नियम धाब्यावर बसवून रस्त्यावरच डांबर जाळत असल्याने हवेचे प्रदूषण वाढत आहे. बोरिवली–कांदिवली परिसरात प्रदूषणाची पातळी आधीच धोकादायक असल्याचे हवामान खात्याने सूचित केले असताना हा निष्काळजीपणा गंभीर ठरत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम : डांबर (बिटुमिन) जाळताना निघणारा धूर आरोग्यास अत्यंत घातक असून श्वसनसंस्थेवर परिणाम, घसा जळजळणे, खोकला, डोळ्यांत जळजळ व पाणी येणे, त्वचेवर खाज व लालसरपणा अशी लक्षणे दिसतात. याचा फटका मानवांसह वृक्ष, प्राणी आणि पक्ष्यांनाही बसत आहे.
नियमांची पायमल्ली : पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार असा धूर निर्माण करणे निषिद्ध आहे. स्थानिक प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक असून विचार करून काम करणे आवश्यक आहे.
कारवाईचे आश्वासन: रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता सचिन भोसले यांनी सांगितले की, “तातडीने प्रक्रिया बंद केली असून वॉर्डला कळवण्यात आले आहे. ठेकेदारावर योग्य कारवाई केली जाईल.” शाखाप्रमुख विजय मालुसरे यांनीही सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली असून, “ठेकेदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास शिवसेना शाखा क्रमांक २० तर्फे उपोषण केले जाईल,” असा इशारा दिला आहे.






