बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच तिची पहिली संक्रांत साजरी झाली असून, त्या सोहळ्यातून लवकरच गुड न्यूज मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या पार्श्वभूमीवर अंकिताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
अंकिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून, ‘आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं’ असं म्हणत अंकिता आणि तिचा पती कुणाल यांनी नव्या कारचा फोटो शेअर केला आहे. या गुड न्यूजमागे कोणतं गुपित आहे, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. मात्र ही नवी पाहुणी म्हणजे अंकिता आणि कुणाल यांनी खरेदी केलेली नवी कार आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं. दुसरी कार घेतली. या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत. माझ्या आणि कुणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील. कृतज्ञता, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे.”अंकिता आणि कुणाल यांनी सुझुकी कंपनीची नवी कार खरेदी केली आहे. या आनंदाच्या क्षणी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून अंकिताचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अंकिताने लग्नाच्या काही दिवस आधीच एक नवी ऑडी कार खरेदी केली होती. ती कार लग्नासाठी गावी नेत असताना अपघातग्रस्त झाली होती. त्या घटनेचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी अनुभव सांगितला होता. काही वर्षांनंतर आता अंकिता आणि कुणाल यांनी पुन्हा एकदा नवी कार खरेदी करत आपल्या यशाच्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.