Saturday, January 24, 2026

जहाँ आरा बेगमची भूमिका आव्हानात्मक

जहाँ आरा बेगमची भूमिका आव्हानात्मक

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 

लावण्यवती, सहजसुंदर अभिनयाची देणगी लाभलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या आगामी चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

स्मिताचे शालेय शिक्षण पुण्यातील लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेत झाले. तिने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. तिला नाटकात काम करण्याची इच्छा असायची; परंतु तिला नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये घेतले जायचे. ती शाळेबाहेरील गणेशोत्सवामध्ये नाटकात भाग घ्यायची. नृत्य बसवायची, सोलो परफॉर्मन्स करायची. ती भरतनाट्यम शिकली. एस. पी. कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले. बारावी झाल्यानंतर यंदा कर्तव्य आहे हा तिला पहिला चित्रपट मिळाला. एकदा ती नाटक पाहायला गेली होती, तिथे शुभांगी गोखले नावाच्या कास्टिंग डायरेक्टर आल्या होत्या. त्यांनी स्मिताला सांगितले की रसिका जोशीने कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शक केदार शिंदेना नवीन चेहरा हवा आहे. तू चित्रपटात काम करणार का? त्यानंतर स्मिताचे फोटो सेशन झाले. तिला यंदा कर्तव्य आहे हा चित्रपट मिळाला. जवळपास चार महिन्यांत चित्रपटाचे शूटिंग झाले. स्वाती नावाची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ‘आभास हा’ हे त्यातील गाणे गाजले होते. हा चित्रपट तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला.

तिने १९ वर्षांमध्ये २६ चित्रपट केले आणि नऊ लीड मालिका केल्या. जवळपास दरवर्षी ती दोन मालिका करीत होती. या गोजिरवाण्या घरात, माहेरची साडी, सावित्री, चारचौघी, सप्तपदी, मांडला दोन घडीचा डाव, श्रीमंत पेशवा बाजीराव, तू माझा सांगाती या मालिका तिने केल्या. लाडी गोडी, आलटून पालटून, या गोल गोल डब्यातला, वन रूम किचन, यंदा कर्तव्य आहे, सुभेदार, संत ज्ञानेश्वराची मुक्ताई, अभंग तुकाराम हे चित्रपट तिने केले. अभंग तुकाराम चित्रपटामध्ये आवलीची भूमिका करताना तिला तिचे वजन वाढवावे लागले. आवलीसारखे दिसण्यासाठी तसा थोडा मेकअप करावा लागला. त्यानंतर तिने अभिनयातून आवली साकारली.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात या वेळी स्मिताला मुघलांच्या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. जहाँ आरा या औरंगजेबाच्या बहिणीची भूमिका ती साकारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, त्यामुळे जहाँ आरा खूप संतप्त झालेली असते आणि तिला या अपमानाचा सूड घ्यायचा असतो. ती आग्र्यामध्ये येऊन बसलेली असते. या भूमिकेसाठी तिला उर्दू भाषा बोलावी लागली होती. मुघलांच्या स्त्रियांचा पेहराव तिला करावा लागला होता. संपूर्णपणे निगेटिव्ह भूमिका तिला साकारावी लागली. प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडून तिने उर्दू भाषा शिकून घेतली. कलाकार म्हणून ही भूमिका साकारणे तिला आव्हानात्मक वाटते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता ती म्हणाली की, दिगपाल अत्यंत अभ्यासू, मेहनती आणि उत्साहवर्धक आहे. तो आम्हाला इतके आव्हान देतो की त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. आमच्या भूमिकेबद्दल डिटेल माहिती देतो. त्या भूमिकेशी संबंधित पुस्तकांची नावे सांगतो. त्यामुळे भूमिका साकारण्यास मदत होते.

'मुक्ताई' नावाचे एकपात्री प्रयोग तिचे सुरू आहेत. त्यामध्ये यशोदा गोष्ट सांगते, ती श्लोक, ओव्या म्हणते. प्रेक्षकांना हा एकपात्री प्रयोग आवडेल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' या चित्रपटासाठी व 'मुक्ताई' या एकपात्री प्रयोगासाठी हार्दिक शुभेच्छा !

Comments
Add Comment