Saturday, January 24, 2026

ठाण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाळ्यात अडकवून तब्बल इतक्या लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

ठाण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या जाळ्यात अडकवून तब्बल इतक्या लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

ठाणे : ऑनलाईन गुंतवणूक आणि घरबसल्या कामाच्या आमिषातून फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून ठाणे शहरात असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे संपर्क साधत एका गृहिणीकडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गृहिणीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावर घरून काम करण्यासंबंधी जाहिरात दिसली. त्यावर प्रतिसाद दिल्यानंतर एका अनोळखी महिलेकडून व्हॉट्सॲपवर संपर्क साधण्यात आला. पुढे तिला टेलिग्राम ॲपवरील वेगवेगळ्या खात्यांशी जोडण्यात आले, जिथे ऑनलाईन काम आणि शेअर मार्केटसदृश गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले.

विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला कमी रकमेवर नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर हळूहळू अधिक रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. काही दिवसांतच तक्रारदाराने जवळपास ७.९५ लाख रुपये ट्रान्सफर केले.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा नफा झाल्याचे आकडे दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या कारणांचा पाढा वाचवण्यात आला. उलट, आणखी गुंतवणूक करण्याचा दबाव टाकण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात संबंधित तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती गोळा केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ॲपवरून येणाऱ्या गुंतवणूक व ‘वर्क फ्रॉम होम’ ऑफरबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अल्प कालावधीत मोठा नफा देण्याचे दावे करणाऱ्या ऑफरवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >