Saturday, January 24, 2026

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली आहे. भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळण्यास सुरक्षेचे कारण देत नकार देणाऱ्या बांगलादेश संघाला आयसीसीने स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर काढले आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ स्पर्धेत सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतातील सुरक्षेचे कारण देत विश्वचषकाचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी केली होती. ही मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेटाळून लावली. आयसीसीने एक स्वतंत्र सुरक्षा समिती नेमली होती ज्याने भारतातील सुरक्षेचा आढावा घेतला आणि धोके नसल्याचे स्पष्ट केले होते. असे असूनही बांगलादेशने आपल्या भूमिकेवर ठाम राहत सहभाग निश्चित केला नाही.

बांगलादेशच्या सहभागाबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची माहिती आयसीसीने बीसीबीला पत्राद्वारे दिली. स्पर्धेचे स्वरूप आणि वेळापत्रक कायम ठेवण्यासाठी तातडीने स्कॉटलंड संघाचा विश्वचषकात समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडला 'ग्रुप सी' मध्ये स्थान मिळाले असून, त्यांचे सामने आता इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ आणि इटली या संघांशी होणार आहेत. आयसीसीच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेचे कारण देत स्पर्धेतून माघार घेण्याच्या बांगलादेशच्या भूमिकेवर अनेक क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांकडून टीका होत आहे. आयसीसीने घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे भविष्यात अशा परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी एक उदाहरण समोर आले आहे. का मिळाली स्कॉटलंडला संधी?

स्कॉटलंड सध्या टी-२० क्रिकेट क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यावर असलेले तेराही संघांनी टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे बाकी संघांच्या उत्तम क्रमवारीमुळे त्यांना पसंती देण्यात आली आहे. पण त्यासोबतच त्यांची गेल्या काही वर्षातील आयसीसी स्पर्धेतील कामगिरीही लक्षात घेण्यात आली आहे. त्यांनी २०२४ टी-२० वर्ल्डकपमध्ये ग्रुप बीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचे आणि इंग्लंडचे गुण सारखे होते, पण इंग्लंडचा नेट रन रेट चांगला असल्याने त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. २०२२ टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. २०२१ टी२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडने बांगलादेशला पराभूत केले होते. दरम्यान, स्कॉटलंड टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी झालेल्या युरोपियन क्वालिफायर्समध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आधी पात्रता मिळाली नव्हती. मात्र आता ते बांगलादेशच्या जागेवर खेळू शकतात.

Comments
Add Comment