राजरंग : राज चिंचणकर
मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारे अनेक किल्ले महाराष्ट्रदेशी इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांना अलीकडेच जागतिक वारसा मानांकने मिळाली आहेत आणि त्यात 'खांदेरी' या जलदुर्गाचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तत्कालीन 'खांदेरी बेट' सागरी युद्धात इंग्रजांकडून जिंकून घेतले. 'खांदेरी' किल्ल्यासाठी सागराच्या रंगमंचावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि ती इतिहासात कायमची नोंदवली गेली. मराठ्यांचा हाच पराक्रम सांगणारे 'दर्याभवानी' हे नाटक काही काळापूर्वी रंगभूमीवर आले आणि या नाटकाच्या माध्यमातून, जागतिक वारसा म्हणून ओळख लाभलेल्या 'खांदेरी'चा इतिहास रंगभूमीवर अवतरला. केवळ ही शौर्यगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने 'दर्याभवानी' हे नाटक रंगमंचावर आणण्याचा घेतलेला ध्यास महत्त्वाचा आहे. हा सगळा इतिहास रंगमंचावर आणायचा म्हणजे त्यासाठी जिद्द, आवेश, धैर्य, आवड आदी गोष्टी अंगात असाव्या लागतात. गेली अनेक वर्षे नाट्यसृष्टीत कार्यरत असलेले निर्माते, लेखक व दिग्दर्शक संदीप विचारे यांनी हा इतिहास रंगभूमीवर आणण्यासाठी कंबर कसली आणि हे नाटक रंगभूमीवर आले. हा सगळा इतिहास भव्यतेने रंगमंचावर उभा करायचा म्हणजे मोठे दिव्यच आहे. साहजिकच, या 'दर्याभवानी'चे मोजकेच प्रयोग रंगभूमीवर होत आहेत. सध्या या नाटकाचे प्रयोग उत्साहात सुरू असतानाच, संदीप विचारे यांनी ऐतिहासिकतेचीच कास धरत पुन्हा एक नवीन प्रयोग करण्याचा घाट घातला आहे. या प्रयोगालाही खांदेरी जलदुर्गाचा संदर्भ आहे. हा प्रयोग मराठी अभिवाचनाचा असून, 'शेर शिवराज है' असे त्याचे शीर्षक आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून, 'शिवस्पर्श' आणि 'यशोगाथा जलदुर्ग खांदेरीची' अशा दोन स्फूर्तिकथांची पदचिन्हे रंगमंचावर उमटली आहेत.
ऐतिहासिक मूल्य लाभलेल्या अभिवाचनाच्या या कार्यक्रमात 'शिवस्पर्श' आणि 'यशोगाथा जलदुर्ग खांदेरीची' या दोन अपरिचित अशा कथांचे वाचन केले जाते. इंग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यापारी धोरण, महाराजांची कूटनीती; तसेच 'खांदेरी' जलदुर्गाच्या उभारणीची रोमहर्षक संघर्षगाथा असे आकर्षक पैलू असलेल्या कथांचे सादरीकरण याद्वारे होत आहे. अभिजीत धोत्रे, अभय धुमाळ, दिग्विजय चव्हाण, कलिका विचारे, विनायक बागवे, प्रदीप जोशी, प्रसाद वैद्य, प्रकाश निमकर आदी कलाकारांचा यात सहभाग असतो. कार्यक्रमाचे संकलन व दिग्दर्शन संदीप विचारे यांचे आहे. संदीप विचारे हे नाट्यनिर्माते असले तरी शिवप्रेमी, दुर्ग व इतिहास अभ्यासक, ट्रेकर अशी त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांनी त्यांच्या गड भटकंतीला ऐंशी-नव्वदच्या दशकात सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 'खांदेरी' जलदुर्गाबद्दल ऐकले होते. त्यांना या जलदुर्गावर जायचेही होते; परंतु तिथे जाण्यास परवानगी नव्हती. फक्त कोळी बांधव वेताळ देवाची पूजा करण्यासाठी 'खांदेरी'वर जात असत. मात्र एकदा योग जुळून आला आणि उरण येथील कोळी बांधवांच्या मदतीने त्यांच्या मच्छीमार होडीतून संदीप विचारे 'खांदेरी'वर जाऊन पोहोचले. साहजिकच त्यांच्या लेखन, दिग्दर्शनाला अभ्यासाची वास्तव किनार लाभलेली आहे.
'शेर शिवराज है' या प्रयोगाच्या निमित्ताने संदीप विचारे यांना बोलते केले असता ते सांगतात, "रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी अशा महाराष्ट्रातल्या ११ किल्ल्यांचा समावेश 'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यावरून प्रेरित होऊन आम्ही 'शेर शिवराज है' या मराठी कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू या सादरीकरणाच्या मागे आहे. यातल्या एका कथेत, मानांकन मिळालेल्या 'खांदेरी'चा इतिहास आहे. श्री शिवछत्रपतींचे आत्तापर्यंत समोर न आलेले इंग्रजांबरोबरचे व्यापारी धूर्त धोरण आम्ही यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिवंगत इतिहासकार निनाद बेडेकर यांचे व्याख्यान आणि दुर्गभ्रमणकार आप्पा परब यांच्या सुभेदार मायनाक भंडारी यांच्यावरचे पुस्तक, ही या कार्यक्रमाच्या मागची प्रेरणा आहे. या दोन्ही कथा अस्सल पुराव्यांवर आधारित आहेत. पण तरी त्या जास्त परिचित नसल्याने, त्यांना अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. जास्तीत जास्त इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमीपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा, यासाठी आम्ही हा कार्यक्रम विनामूल्य किंवा स्वेच्छा मूल्य तत्त्वावर करत आहोत. आमचे अभिवाचकही मानधनाची अपेक्षा न बाळगता हे अभिवाचन करत असतात. त्याचबरोबर, मानांकन मिळालेल्या किल्ल्यांचा प्रचार व्हावा; 'दर्याभवानी' नाटकाचाही प्रसार व्हावा; हा आमचा उद्देश आहे. 'उर्विजा थिएटर'तर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी फारशा परिचित नसलेल्या, पण ऐतिहासिक आधार असलेल्या कथा आम्ही सादर करत आहोत".