Saturday, January 24, 2026

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा

मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) विशेष स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार ही मोहीम लवकरच राबवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

युनेस्कोने महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या ११ किल्ल्यांना ऐतिहासिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ला स्वच्छता व संवर्धन मोहीम’ राबवण्यात येणार असून, या मोहिमेचे ब्रीदवाक्य ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ असे असणार आहे. गडकिल्ल्यांच्या परिसरात कार्यरत सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.

 

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे पुनर्चक्रण, मासिक स्वच्छता मोहिमा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच वृक्षारोपण असे विविध उपक्रम या मोहिमेत राबवले जाणार आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ लवकरच किल्ले रायगड येथे होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली. दरम्यान, ११ ही गडकिल्ल्यांची स्वच्छता राखून त्यांचा ऐतिहासिक दर्जा जतन करण्यासोबतच परिसरातील पर्यावरण संवर्धनालाही चालना दिली जाईल, असा विश्वास मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >