छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर बांधलेला,सुमारे ४० वर्षे जुना आणि अंदाजे १० टन वजनाचा स्टील पूल रातोरात लंपास केला. हा पूल ढोडीपारा परिसरा मध्ये असून, तो प्रामुख्याने पादचाऱ्यांसाठी वापर केला जात होता.
१८ जानेवारी रोजी तिथे राहत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले की पूल अचानक गायब झाला आहे. या घटने नंतर तेथील भागाचे नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना आढळले की चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने पुलाचे लोखंडी रेलिंग आणि संपूर्ण रचना कापून वेगवेगळ्या भागांत विभागली आणि भंगार म्हणून विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केली. कोरबाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लखन पाटले यांनी सांगितले की, तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि कसून चौकशीनंतर या गुन्ह्यात सुमारे १५ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत लोचन केवट, जयसिंह राजपूत, मोती प्रजापती, सुमित साहू आणि केशवपुरी गोस्वामी उर्फ ‘पिक्चर’ या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चौकशीत आरोपींनी पुलातील लोखंड स्क्रॅपमध्ये विकण्याचा कबुलीजबाब दिला आहे. मुख्य आरोपी मुकेश साहू आणि असलम खान यांच्यासह इतर १० आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरीतील सुमारे सात टन स्टील नहरातून जप्त केले असून, चोरीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे. उर्वरित स्टील कुठे विकले गेले, याचा तपास सुरू आहे. पूल चोरी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना नहर ओलांडण्यासाठी जवळील काँक्रीट पुलाचा वापर करावा लागत आहे.






