बॉर्डर २: सनी देवलच्या बॅार्डर २ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर आपली वेगळीच धमाल केली आहे.देशभक्ती, ॲक्शन आणि भावनिक कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ने छप्परफाड ओपनिंग करत पहिल्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला मागे टाकले असले, तरी जागतिक स्तरावर मात्र ‘धुरंधर’चा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडण्यात ‘बॉर्डर 2’ थोडक्यात अपयशी ठरला आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर ४१.५ कोटींची कमाई केली होती, तर ‘बॉर्डर 2’चा जागतिक कलेक्शनचा आकडा ४१ कोटींवर स्थिरावला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ओव्हरसीज मार्केटमध्ये ‘बॉर्डर 2’ची मर्यादित कमाई. परदेशात या चित्रपटाने सुमारे ५ कोटींची कमाई केली, तर ‘धुरंधर’ने ७.७० कोटी रुपये कमावले होते.
उत्तर भारतात आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सनी देओलच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा ‘बॉर्डर 2’ला मिळताना दिसत आहे. २६ जानेवारीचा मोठा विकेंड समोर असल्याने, येत्या काही दिवसांत हा चित्रपट ‘धुरंधर’चा जागतिक विक्रम मोडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘बॉर्डर 2’ची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असून भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या शौर्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सैनिकांच्या कुटुंबातील भावना दाखवण्यात आल्या आहेत, तर उत्तरार्धात थरारक युद्धदृश्ये पाहायला मिळतात. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरतो. दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी युद्धपटाला मानवी संवेदनांची जोड देत एक दमदार अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.