सिटीझन सायन्स उपक्रमाद्वारे वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवण्याची संधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न फणसाड वन्यजीव अभयारण्यात पुन्हा एकदा पक्षांचा किलबिलाट मोजला जाणार आहे. 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' आणि 'महाराष्ट्र वन विभाग' (ठाणे वन्यजीव विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'फणसाड पक्षी गणना' आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमात नागरिक, पक्षीमित्र आणि निसर्ग अभ्यासक सहभागी होऊन शास्त्रीय पद्धतीने पक्षी निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करतील. हा उपक्रम एसबीआय फाऊंडेशनच्या 'CONSERW' कार्यक्रमांतर्गत राबवला जात आहे. ही केवळ एक सहल नसून, एक महत्त्वाचा 'सिटीझन सायन्स' उपक्रम आहे. यामध्ये सामान्य नागरिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून पक्ष्यांची निरीक्षण नोंदवतील, ज्यामुळे या भागातील जैवविविधतेचा अधिकृत दस्तऐवज तयार होण्यास मदत होणार आहे.
जेव्हा सामान्य माणूस विज्ञानाशी जोडला जातो, तेव्हा संवर्धनाचे कार्य अधिक वेगाने होते. फणसाड पक्षी गणना' हा केवळ एक छंद म्हणून राबवला जाणारा उपक्रम नसून, तो एक 'सिटिझन सायन्स' प्रकल्प आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून पक्ष्यांच्या प्रजातींची शास्त्रोक्त नोंद करणे. पद्धतशीर निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण तंत्रांचा वापर करणे. फणसाड मधील जैवविविधतेचा वैज्ञानिक डेटा तयार करणे. या महत्त्वाची बाबी होणार आहेत.
कोकणातील मुरुड-रोहा पट्ट्यात असलेले हे अभयारण्य रातवा, बेडुकमुखी, गिधाडे, मलबारी धनेश यासाठी प्रसिद्ध आहे. फणसाड अभयारण्य महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याच्या संवर्धनासाठी चालू झाले आहे. तेथे २५० हून अधिक प्रकारचे पक्षी सापडतात. अनेक स्थलांतरित पक्षी इथे येतात.
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध क्षेत्र आहे. 'सिटीझन सायन्स' या संकल्पनेचा मूळ उद्देशच हा आहे की, सामान्य नागरिकांना सहभागी करून घेणे. या पक्षी गणनेच्या माध्यमातून संकलित होणारा डेटा हा केवळ आकडा नसून, तो भविष्यातील संवर्धन आराखडा तयार करण्यासाठी एक महत्त्वाचा वैज्ञानिक दस्तऐवज ठरेल. निसर्गप्रेमींनी केवळ पक्षी पाहण्यापुरते मर्यादित न राहता, या वैज्ञानिक प्रक्रियेचा भाग होऊन फणसाडच्या या अनमोल ठेव्याचे दस्तऐवजीकरण करण्यास पुढे यावे.
- डॉ. निखिल भोपळे, (व्यवस्थापकीय विश्वस्त, ग्रीन वर्क्स ट्रस्ट)