Saturday, January 24, 2026

जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज

जिल्हा परिषदेसाठी ४१, तर पंचायत समितीसाठी ८३ अर्ज

पनवेल : रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पनवेल तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ८ गटांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पनवेलमध्ये यंदाही मुख्य लढत भाजप आणि शेकाप यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे झाली आहेत, त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. सत्तेची समीकरणे कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तालुक्यात एकूण ३४६ केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. तसेच ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन विजयाचे गुलाल उधळले जातील. गेल्या काही वर्षांत अनेक मातब्बर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बदलल्याने जुन्या गणितांना छेद मिळण्याची शक्यता आहे. भाजप आपली सत्ता राखणार की शेकाप पुन्हा एकदा वर्चस्व मिळवणार, याचा फैसला ७ फेब्रुवारीला होईल. सध्या तरी सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या मैदानात उडी घेतली असून गावपातळीवरील बैठका आणि रणनीतीला वेग आला आहे.

Comments
Add Comment