Saturday, January 24, 2026

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १ हजार ७२ उमेदवार रिंगणात

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  १ हजार ७२ उमेदवार रिंगणात

छाननीनंतर १६ अर्ज बाद, राजकीय हालचालींना वेग

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दोन्ही मिळून १,०७२ उमेदवार रिंगणात आहेत. २३, २४, २७ जानेवारी या तीन दिवसांत कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेणार यावरून लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

१५ पंचायत समितीसाठी एकूण ६९७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११ अर्ज बाद झाल्याने ६८६ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ३९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी छाननीअंती ५ अर्ज बाद करण्यात आल्याने ३८६ उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढविणार आहेत.

उमेदवारी अर्जाच्या छाननी व हरकतींवरील सुनावणी प्रक्रियेमुळे माणगाव, खालापूर आणि पनवेल तालुक्यांमध्ये सुनावणी उशिरापर्यंत सुरू होती. काही ठिकाणी उमेदवारांनी दाखल केलेल्या हरकती, कागदपत्रांतील त्रुटी, तसेच आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कामकाज करावे लागले. या प्रक्रियेदरम्यान निवडणूक कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

काही ठिकाणी अर्ज बाद झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली, तर काही उमेदवारांनी कायदेशीर बाबींचा आधार घेत आपली बाजू मांडली. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारीची मुदत पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असून, प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता लक्ष 'अर्ज माघारी'कडे कागदपत्रांची नीट पूर्तता न केल्याने अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या दोन उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. तर कर्जतमध्ये जि. प. गटातील एक अर्ज बाद ठरविला. मात्र त्यांनी अन्य दोन अर्ज दाखल केलेले वैध ठरविण्यात आल्याने त्यांची उमेदवारी सुरक्षित राहिली. उर्वरित दोन अपक्षांचे अर्जही असेच कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी छाननीत बाद झाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील एकाही प्रमुख राजकीय पक्षांचा अर्ज छाननी बाद झालेला नाही. जे १६ अर्ज बाद ठरविण्यात आले त्यापैकी बरेचचे अर्ज हे अपक्ष उमेदवारांचेच असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Comments
Add Comment