Friday, January 23, 2026

‘संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज’

‘संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज’

मुंबई  : सार्वजनिक उत्सव, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाज, संस्कृती, राष्ट्र आणि एकता यांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दीर्घ परंपरेप्रमाणेच बौद्धिक समृद्धी देणाऱ्या व्याख्यानमालांची परंपरा शासनाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा हा पहिला उपक्रम आहे, असे सांस्कृतिक कार्य व माहिती या तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अभ्यासक अच्युत गोडबोले, सल्लागार समितीचे सदस्य, डॉ. शिरीष ठाकूर आणि सोनिया परचुरे उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, आज प्रत्येक नागरिकाचा तंत्रज्ञानाशी थेट संबंध आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती संकलित होत असून, या तंत्रज्ञानाचा योग्य, सुरक्षित आणि सकारात्मक वापर कसा करायचा हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषयावर अच्युत गोडबोले यांच्यासारख्या अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन समाजासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साहित्य, लोककला, लोकसंगीत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांतील मराठी निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. राज्यात वर्षभरात १२०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात असून, ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >