पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा (स्टेज-४) पार पडत आहे. या भव्य क्रीडा स्पर्धेसाठी प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. मात्र, प्रमुख रस्त्यांवर लावण्यात आलेल्या रस्तेबंदीच्या फलकांमुळे आणि बदललेल्या मार्गांमुळे सकाळीच पुणेकरांमध्ये मोठा गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. सायकल स्पर्धेचा मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), सहकारनगर मधील अंतर्गत रस्ते आणि डेक्कन परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीसाठी कडक निर्बंध लादले आहेत. अनेक ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ता पूर्णपणे बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. ऐन कामाच्या दिवशी तब्बल नऊ तास रस्ते बंद राहणार असल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेचा टप्पा पार पडल्यानंतर टप्प्याटप्प्याने रस्ते खुले केले जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तरीही, सायंकाळपर्यंत हा गोंधळ कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मध्यवर्ती भागात जाणे टाळावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे.
बदलापूर : बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा गंभीर ...
पुणेकर चक्रावले! पोलीस म्हणतात रस्ता अर्धा तास बंद
सायकल स्पर्धेचा हा अखेरचा टप्पा शहरातील महत्त्वाच्या भागांना स्पर्श करणार आहे. यामध्ये पाषाण सर्कल, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे पुतळा, पौड रस्ता, नळस्टॉप, म्हात्रे पूल, टिळक चौक, शंकरशेठ रस्ता, नेहरू रस्ता, लाल महाल चौक, स. गो. बर्वे चौक आणि बालगंधर्व चौक यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की, "स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते टप्प्याटप्प्याने केवळ अर्ध्या तासासाठी बंद केले जातील. सायकलस्वार पुढे जाताच रस्ता तत्काळ मोकळा केला जाईल." मात्र, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता आणि डेक्कन परिसरात लावण्यात आलेल्या अधिकृत फलकांवर मात्र संपूर्ण दिवसभर रस्ता बंद असल्याचे नमूद केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या मार्गामुळे शहरातील वाहतुकीची मुख्य नस असलेल्या रस्त्यांवर परिणाम होणार आहे. जर फलकांनुसार रस्ते दिवसभर बंद राहिले, तर संपूर्ण पुणे शहरात वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तातडीने यावर स्पष्टीकरण देऊन नागरिकांना योग्य माहिती पोहोचवणे गरजेचे झाले आहे.
मग रस्ते सकाळी ९ पासूनच का बंद?
सायकल स्पर्धेचा अंतिम टप्पा बालेवाडी येथून सुरू होणार असून तो पाषाणमार्गे पुन्हा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत जाणार आहे. संपूर्ण मार्गक्रम पाहता, हे सायकलपटू पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यासाठी साधारणपणे दुपारचे १२:३० ते १ वाजतील, असा प्राथमिक अंदाज आहे. असे असतानाही, प्रशासनाने शहरातील महत्त्वाचे रस्ते सकाळी ९ वाजल्यापासूनच सर्वसामान्यांसाठी बंद केले आहेत. "दुपारी येणाऱ्या स्पर्धेसाठी सकाळीच रस्ते अडवण्याचा तुघलकी निर्णय का?" असा सवाल आता विचारला जात आहे. सकाळी ९ ही वेळ कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. नेमकं याच वेळी रस्ते बंद केल्याने शहरातील सिंहगड रस्ता, डेक्कन आणि पाषाण परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सायकलपटू येईपर्यंत तब्बल ३ ते ४ तास हे रस्ते रिकामे राहणार आहेत, मात्र तरीही सर्वसामान्यांना तिथून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. "प्रशासनाने स्पर्धा जरूर घ्यावी, पण त्याचे नियोजन करताना पुणेकरांच्या वेळेचाही विचार करावा. सायकलपटू येण्याच्या एक तास आधी रस्ते बंद केले असते तर चालले असते, पण सकाळी ९ पासून रस्ते अडवून धरण्यात काय अर्थ आहे?" अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.






