तेहरानत्र : इराणमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची पहिली अधिकृत आकडेवारी इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने जाहीर केली आहे. या अधिकृत माहितीनुसार, या हिंसाचारात एकूण ३,११७ लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये मारले गेलेल्या ३,११७ लोकांपैकी २,४२७ जण हे 'नागरीक' (Civilians) आणि 'सुरक्षा दलाचे जवान' (Security Forces) होते. उर्वरित ६९० जणांबाबत सरकारने अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी, त्यांना 'दंगलखोर' किंवा 'दहशतवादी' म्हणून संबोधले आहे. हा हिंसाचार इराणच्या दशकांमधील इतिहासातील सर्वात भीषण मानला जात आहे, ज्याची तुलना १९७९ च्या 'इस्लामी क्रांती'शी केली जात आहे.इराणचे सर्वोच्च नेते 'अयातुल्ला अली खामेनी' (Ayatollah Ali Khamenei) यांनी यापूर्वीच या निदर्शनांमध्ये हजारो लोक मारले गेल्याचे मान्य केले होते आणि या हिंसाचारासाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते.
इराण सरकारने जाहीर केलेली ही आकडेवारी मानवाधिकार संघटनांच्या दाव्यापेक्षा कमी आहे. अमेरिकेतील 'ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी'ने (HRANA) म्हटले आहे की, मृतांचा आकडा ४,९०० पेक्षा जास्त असू शकतो. इंटरनेटवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खरी माहिती समोर येण्यास उशीर होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराग्ची (Abbas Araghchi) यांनी या कारवाईनंतर अमेरिकेला थेट इशारा दिला असून, जर अमेरिकेने हस्तक्षेप केला तर त्याला चोख प्रत्यय (Firing back) दिला जाईल, असे म्हटले आहे. सध्या इराणमध्ये इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध असून, सुरक्षा दलांनी आंदोलने पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या निदर्शनांची सुरुवात प्रामुख्याने खालावलेली अर्थव्यवस्था आणि महागाईच्या (Economic hardship) मुद्द्यावरून झाली होती, ज्याचे रूपांतर नंतर सरकारविरोधी आंदोलनात झाले.






