मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना महायुतीचा महापौर होणार असल्याने मोठा पक्ष असलेल्या भाजपाच्या वतीने एक ते दोन तसेच तीन टर्म नगरसेवक पद भूषवणाऱ्या नगरसेविकांची नावे चर्चेत येत आहे. यामध्ये प्राधान्याने राजेश्री शिरवडकर, अलका केरकर, योगिता कोळी, प्रिती सातम, रितू तावडे, जागृती पाटील तसेच शीतल गंभीर आदींची नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या महिलांपैंकी कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते की पक्ष चर्चेत नसलेल्या नगरसेविकेला महापौरपदाच्या खुर्चीत बसवून धक्का तंत्र आजमावतो याकडे अनेकांचे लक्ष आहे. महापौर कोणीही झाले तरी त्यांचा मुक्काम भायखळा येथील राणीबागेतल्या (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) महापौर बंगल्यातच असणार आहे. यामुळे मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी महापौर बंगल्याच्या डागडुजीचे काम वेगाने सुरू आहे.
कोविड काळात २०२२ मध्ये मुंबई मनपावर प्रशासकाची नियुक्ती झाली. कार्यकाळ संपल्यामुळे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर बंगला सोडला, तेव्हापासून हा बंगला रिकामा होता. काही वर्षे कोणीच वास्तव्यास नसल्यामुळे बंगल्याची रया गेली होती. पण नव्या महापौरांचे आगमन होणार याचा अंदाज येताच प्रशासनाने बंगल्याच्या डागडुजीला सुरुवात केली. तब्बल साडेतीन वर्षे बंद असलेला महापौर बंगला आता नव्या महापौरांसाठी सज्ज होत आहे. मनपा प्रशासन सध्या बंगल्याची डागडुजी करण्यात गुंतले आहे. फर्निचर, खुर्च्या, गाद्या, कार्पेट, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती अशी अनेक डागडुजीची कामं वेगाने सुरू आहेत. हेरिटेज सोफा आणि खुर्च्यांना नवीन फॅब्रिक तसेच फोम बसवून नवीन झळाळी देण्याचे काम सुरू आहे.
बंगल्याच्या संरचनात्मक तसेच कौलांचा आधार असलेल्या लाकडाची डागडुजी, पेंटिंग आणि पॉलिशिंगची कामे, वाळवीप्रतिरोधक कामे करण्यात येत आहेत. तसेच ८७ आरएफटी सोफ्याची डागडुजी, ४५ लाकडी खुर्च्या तसेच महापौरांसाठी दोन खास खुर्च्यांचे काम प्रस्तावित आहे. सोफ्यासाठी नवीन कुशन, सहा ते आठ इंच जाडीच्या मेमरी फोम गाद्याही आणण्यात येणार आहेत. बंगल्यात पीव्हीसी फ्लोअरिंग (१६१.८६ चौ.मी.), इनडोअर आणि आउटडोअर वापरासाठी लाल कार्पेट, लाकडी खुर्च्या, सोफा, बेड यांना पॉलिश करण्याचेही काम सुरू आहे. जुन्या पीव्हीसी फ्लोअरिंग आणि कार्पेट काढून टाकणे, पितळी रॉड काढून पुन्हा बसवणे, तसेच फ्लोअरिंगसाठी बेस लेव्हलिंगची कामेही काही दिवसांत प्रस्तावित आहेत.
प्रशासक नेमण्याच्या आधी महापौरांचा निवास हा राणीच्या बागेतील नव्या महापौर बंगल्यात हलवण्यात आला. राणीच्या बागेतील हा बंगला १९३१ मध्ये बांधण्यात आला. मात्र, ब्रिटिशांनी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. १९७४ पासून हा बंगला म्हणजे पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान होते. त्यानंतर याचा वापर महापौरांसाठी होऊ लागला आहे. महापौर बंगला पालिकेच्या हेरिटेज विभागाच्या अखत्यारित येत असून, त्याचे आकारमान साधारण सहा हजार चौरस फूट आहे. बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ १७ हजार चौरस फूट इतकं आहे. तर बंगल्याचं बांधकाम सहा हजार चौरस फूट जागेवर आहे. बंगल्यात खाली चार, वरच्या मजल्यावर चार अशा एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल (सभागृह) आहेत. राणीच्या बागेतील पाटणवाला मार्गाला समांतर असलेला हा सागवान लाकडाची रचना असलेला बंगला कौलारू आहे. विशेष म्हणजे हा बंगला व्हीलचेअर सुलभ आहे. या बंगल्यात राहण्यासाठी आलेले पहिले महापौर हे विश्वनाथ महाडेश्वर हे होते. ते २१ जानेवारी २०१९ पासून तिथे राहू लागले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांचे राणीबागेतल्या महापौर बंगल्यात वास्तव्य होते. याआधी अनेक वर्षे महापौर बंगला हा दादर येथे शिवाजी पार्क परिसरात होता. पण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी या जागेचा वापर करण्याचा निर्णय झाला. यानंतर महापौरांचे अधिकृत निवासस्थान स्थलांतरित करण्यात आले. आता मुंबईच्या महापौरांचा मुक्काम हा भायखळा येथील राणीबागेतल्या (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय) महापौर बंगल्यातच असणार आहे.






