Friday, January 23, 2026

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्र सरकारने ही घोषणा केली. देशभरातून २७१ नामांकनांतून ले.कर्नल शेळके यांची वैयक्तिक श्रेणीसाठी निवड झाली आहे.

लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांनी २०२४ मध्ये केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेली कामगिरी या पुरस्कारासाठी निर्णायक ठरली. जेव्हा वायनाडमध्ये निसर्गाचे थैमान सुरू होते, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे चूरलमाला येथील १९० फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत केलेली उभारणी. या पुलामुळे संपर्क तुटलेल्या दुर्गम गावांशी पुन्हा संवाद प्रस्थापित झाला आणि मदतकार्य पोहोचवणे शक्य झाले. इतकेच नव्हे तर, कोमात्सु पीसी २१० एक्सकॅव्हेटरचा कल्पक वापर करून त्यांनी अवघ्या चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार केला होता. त्यांच्या या विलक्षण इंजिनीअरिंग कौशल्यामुळे मदतकार्याला मोठी गती मिळाली. प्रत्यक्ष कार्यासोबतच त्यांनी आतापर्यंत २३०० हून अधिक जवानांना आपत्ती निवारणाचे विशेष तांत्रिक प्रशिक्षणही दिले आहे.

गाडीलगाव ते भारतीय लष्कर : एक प्रेरणादायी परिचय

अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगाव येथील रहिवासी असलेल्या सीता शेळके यांचा लष्करापर्यंतचा प्रवास जिद्दीचा आहे. त्यांचे वडील अशोक भिकाजी शेळके हे पेशाने वकील आहेत. सीता यांनी आपले मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण अहिल्यानगरमधूनच पूर्ण केले. सुरुवातीला पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सीता यांनी नंतर देशसेवेसाठी लष्कराची निवड केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी एसएसबी परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०१२ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >