Friday, January 23, 2026

मराठवाड्यात महिलांना लॉटरी

मराठवाड्यात महिलांना लॉटरी
मागच्या आठवड्यात मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी वाण लुटले. महिलांच्या याच आनंदाला पारावार उरलेला नसताना अशा परिस्थितीत मराठवाड्यात महापौरपदासाठी महिलाराज येणार. मराठवाड्यातील पाचपैकी तब्बल तीन जागांवर महिलाराज असणार आहे. गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीचा हा निर्णय मराठवाड्यातील भावी महिला महापौरांच्या आनंदाला उधाण आणणारा आहे.  

मराठवाड्यात असलेल्या पाचपैकी तीन महानगरपालिकेत महापौरपदी विराजमान होण्याची संधी महिलांना मिळणार आहे. मराठवाड्यात सर्वाधिक महिला महापौर असणार आहेत. महिलांसाठी असलेली ही लॉटरीच म्हणावी लागणार आहे. नांदेड, जालना तसेच लातूर या तीन महानगरपालिकेत महिलांना महापौरपद सोडतीमध्ये सुटले आहे. महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी मंत्रालयात सोडत काढण्यात आली. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड व लातूर या पाच महानगरपालिकांपैकी तीन ठिकाणी महिला महापौर विराजमान होणार आहेत. नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. महापौरपदाचे हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढण्यात आले. त्यामुळे या आधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला ठेवण्यात आले. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी ही सोडत असणार आहे.

मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होऊन दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाले. पक्षीय बलाबल पाहता नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर या तीन महापालिकेत महापौरपद भाजपकडे असणार आहे, तर परभणी महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महापौर होणार आहे. लातूरमध्ये काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश मिळाल्याने मराठवाड्यातील लातूर महापालिकेवर काँग्रेसचा महापौर विराजमान होईल. नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी सोडतीमध्ये निघाले आहे, तर जालना व लातूर या ठिकाणी देखील अनुसूचित जाती महिलेसाठी सोडत निघाली आहे. या तीन ठिकाणी महिला महापौर विराजमान होतील. अनेकदा महिला महापौर किंवा नगराध्यक्ष असल्या तरी त्या ठिकाणी त्यांचे पती किंवा रक्ताचे इतर नातलग त्या पदावर 'स्वतःची' चालवत असतात. महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांचा कारभार खरोखर महिलांनी पाहावा, अशी अपेक्षा महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे; परंतु प्रत्यक्षात महिलांच्या आरक्षणावर पुरुषांचाच कारभार असतो. असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. महिला व पुरुषांमध्ये भेदभाव नाही असे बोलण्यापुरते असले तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच असते. छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमच भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्या ठिकाणी राज्याचे मंत्री अतुल सावे तसेच खासदार भागवत कराड व आमदार संजय केनेकर यांच्या मर्जीतला महापौर होईल.जालना येथेही भाजपचे आमदार कैलास गोरंट्याल तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून महापौर निवडला जाईल.

नांदेडमध्ये भाजपचा महापौर निवडत असताना राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या मर्जीतील नगरसेविकेला संधी मिळेल, तर परभणी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांच्या मर्जीतील महापौर असणार आहेत. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विचारसरणीचा व आमदार अमित देशमुख यांच्या विश्वासातील महिलेला महापौरपदाची संधी मिळणार आहे. मराठवाड्यातील पाचही महानगरपालिकेत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांना सत्काराचा आनंद घेता घेता आपापल्या भागातील समस्यांचा ताण घ्यावा लागत आहे. जवळपास पाचही महानगरपालिकांचे प्रश्न सारखेच आहेत. पाणी, वीज समस्या तसेच तुंबलेली ड्रेनेज यामुळे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन दशकांपासून पाणीप्रश्न सुटलेला नाही. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आश्वासने दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्यातून एकदा येणारे पाणी वेळेवर देण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. पाच दिवसांपूर्वी जलवाहिनी नादुरुस्त झाली. ती दुरुस्त करण्यात बराच वेळ गेला. यामुळे बिघडलेले वेळापत्रक अजूनही सुरळीत झाले नसल्याने छत्रपती संभाजीनगरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याबरोबरच अनेक वसाहतींना नऊ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागून नवीन नगरसेवक निवडून आल्याने नागरिकांच्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून वाढल्या आहेत. जालना महानगरपालिकेसाठी यावेळी पहिल्यांदाच मतदान झाले. त्या ठिकाणी देखील नगरसेवकांकडून पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. हा प्रसंग संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला होता. त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महापौरांना लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न मिटवावा लागणार आहे. उन्हाळा काही महिन्यानंतर सुरू होईल, त्यामुळे आत्तापासूनच नगरसेवकांना पाण्याच्या प्रश्नाची चिंता सतावत आहे. नांदेड तसेच परभणी महानगरपालिका अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना इतर तीन महापालिकांच्या तुलनेत मुबलक पाणी आहे. फक्त पाणी सोडण्याच्या वेळा ठरविल्याप्रमाणे पाळल्या, तर नागरिकांचा बराच ताण कमी होणार आहे. सुदैवाने मराठवाड्यातील पाचपैकी तीन महापालिकांमध्ये महिला महापौर होणार असल्याने महिलांचा पाण्याबाबत असलेला त्रास या महिलांना लवकर कळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Comments
Add Comment