दावोसमधील आर्थिक परिषदेत ट्रम्प यांच्यांकडून कौतुकाचा वर्षाव
दावोस: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘जवळचा मित्र’ व ‘उत्तम व्यक्ती’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली. उभय देशांमध्ये लवकरच व्यापार करार होईल असा आत्मविश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. वार्षिक आर्थिक परिषद, दावोस येथे ट्रम्प बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मनीकंट्रोलशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध आणि दोन्ही देशांमधील व्यापार करारावर भाष्य केले. ‘तुमच्या पंतप्रधानांप्रती मला खूप आदर आहे. ते उत्तम व्यक्ती असून माझे जवळचे मित्र आहेत. लवकरच आम्ही मोठा करार करू’, असे ट्रम्प म्हणाले.५० टक्के टॅरिफचा फटका
भारत – अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले असताना ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाष्य करताना पॉलिसी केंद्रस्थानी ठेवत व्यक्तिगत टीका टाळल्याचे दिसून आले. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. भारतातील अमेरिकन राजदूत सरजिओ गोर यांनी दोन्ही देशातील संबंधावर सकारात्मक भाष्य केले आहे. व्यापारामुळे ताणलेले संबंध पूर्ववत होतील, असा विश्वास व्यक्त केला.
शेअर बाजारात पडसाद : ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत घेतलेल्या मवाळ भूमिकेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या घसरणीला पूर्णविराम देत बाजार जोमाने सावरला. आयटी, फार्मा व मेटल क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा ८२ हजार ३०० चा टप्पा गाठला. बाजारात २ हजार ८०३ शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर १ हजार २३५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही प्रत्येकी १ टक्क्याची वाढ झाल्याने बाजारात सर्वसमावेशक मजबुतीचे संकेत मिळाले आहेत.






