ठाणे :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणात शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिल्यामुळे उबाठातून मोठी खळबळ उडाली आहे. मनसेच्या या निर्णयावरून उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्याद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या युतीवर नाराजी व्यक्त करत “शिंदेसेनेसोबत मनसेने जाणे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही” असे म्हटले आहे. नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “माझ्या दृष्टीने विचार केला तर हे माझ्या मनाला पटत नाही. पटणार नाही. मी पटवून घेऊ शकत नाही. पण कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात.”
त्यांनी पुढे म्हटले, “आपण काही गोष्टी मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो. या सगळ्या घटना घडतात. त्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्या आहेत, याबद्दल जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत त्यावर मी बोलू शकत नाही.” मनसेने शिंदे सेनेसोबत जाण्याच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, “अशा राजकारणात नीतिमत्ता वाहून जाऊ नये. कल्याण-डोंबिवलीमध्ये जे घडले ती त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही.”