Friday, January 23, 2026

ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा: मालवण नगरी सजली

ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा: मालवण नगरी सजली

कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेच्या भेटीला

मालवण  : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग, राणे, परब मानकरी, कांदळगांव ग्रामस्थ व रयतेसह आज (२३ जानेवारी) रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना होत आहेत. देव रामेश्वर मार्गावर गुढ्या, तोरणे, पताका, कमानी, फलक उभारले असून रांगोळ्या घालण्यात आल्या आहेत. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी देवाचे स्वागत करत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. सकाळी ९ वाजता देव रामेश्वर यांचे वारेसुत्र तरंग व रयतेसह मालवण येथे प्रयाण. दुपारी जोशी मांड मेढा मालवण येथे प्रस्थान, नंतर होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होणार आहे. सायंकाळ नंतर देव दांडेश्वर मंदिराची भेट घेऊन त्यानंतर मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे श्री देव रामेश्वर मुक्काम करणार आहे. यावेळी महाप्रसाद असणार आहे.

२४ रोजी सकाळी ८ वाजल्यानंतर कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वाचन. नंतर दुपारी रामेश्वर मांड बाजारपेठ येथे आगमन, भाविकांना दर्शन व आशीर्वचन नंतर रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी आणि भंडारी हायस्कूलच्या पाठीमागील हॉलमध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन. तेथून रामेश्वर मांड येथून रामेश्वर मंदिर, कांदळगावला परतीचा प्रवास. सायं. ४ नंतर, रात्री ८ वा. देव महापुरुष देवस्थान (मांगरी) कोळंब येथे पालखी, तरंग यांचे त्या दिवसासाठी विसर्जन आणि मुक्काम. नंतर गणेश (अवि) नेरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन. नंतर कांदळगावला जाणाऱ्या भाविकांसाठी नेरकर यांच्यामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे.

रविवार, २५ रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वाजता कोळंब महापुरुष देवस्थान येथे महाप्रसाद, नंतर आशीर्वचन देऊन देव रामेश्वर, इतर वारेसुत्र, पालखी, तरंग, भाविक आणि गावघर, कांदळगाव स्वगृही परतीच्या प्रवासाला निघणार. वाटेत आशीर्वचन देत देत रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथे या ऐतिहासीक तीन दिवसीय सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव, मानकरी व ग्रामस्थांनी दिली आहे. या अनोख्या भेट सोहळ्याला हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

Comments
Add Comment