२० जानेवारी रोजी सकाळी १९ वर्षीय करुणा निकम हिचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला. करुणा पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला, असा बनाव पती सुभाष निकम आणि सासरा गौतम निकम यांनी रचला होता. त्यांनी हीच माहिती करुणाचे वडील दीपक सोनवणे यांना दिली. मात्र, आपल्या लेकीच्या सासरच्यांच्या वागण्यातील विसंगती आणि गोंधळ पाहून वडिलांना संशय आला.
हुंड्यासाठी अमानुष छळ
तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. करुणाच्या लग्नात ठरलेला ५० हजार रुपयांचा हुंडा तिचे वडील परिस्थितीअभावी देऊ शकले नव्हते. याच कारणावरून पती आणि सासरा तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. धक्कादायक बाब म्हणजे, सासऱ्याला आपल्या दुसऱ्या मुलाचे लग्न करायचे होते आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्यासाठी तो करुणावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता.
मृत्यूच्या आदल्या रात्रीचा तो फोन
१९ जानेवारीच्या रात्री करुणाने वडिलांना फोन करून आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला होता. सासरचे लोक आपल्याला मारहाण करत असून आपल्याला तिथे राहणे अशक्य झाले असल्याचे तिने रडत सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या मृत्यूची बातमी धडकली. विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा दावा सासरच्यांनी केला असला, तरी छळाला कंटाळून करुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
१० जणांवर गुन्हा, सासरा अन् पती जेरबंद
वडिलांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्या. केवळ बनाव रचून सुटका होणार नाही हे लक्षात येताच पोलिसांनी सखोल तपास केला. या प्रकरणी पती सुभाष निकम आणि सासरा गौतम निकम यांच्यासह कुटुंबातील एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.