मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेला केबल-आधारित (Cable-Stated) उड्डाणपूल आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. केशवराव खाड्ये मार्गावरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पूल ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा डौलदार ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन (मुख्य स्तंभ). वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या या स्तंभाचे आतापर्यंत ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पायलॉन पुलाचा भार पेलण्यासाठी केबलच्या साहाय्याने जोडला जाणार असून, यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून प्रशासनाला गती देण्याचे आदेश दिले. पुलाच्या मुख्य कामासोबतच पोहोच रस्ते (Approach Roads) आणि इतर तांत्रिक कामे समांतरपणे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध कामांच्या टप्प्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून, ऑक्टोबरच्या अखेरीस हा पूल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महालक्ष्मी स्थानकाजवळील हा पूल पूर्ण झाल्यामुळे केशवराव खाड्ये मार्ग आणि सात रस्ता परिसरातील प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. केबल-स्टेड तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळांच्या वर कमी खांबांमध्ये हा पूल उभा राहत असल्याने रेल्वे वाहतुकीलाही कमीत कमी अडथळा निर्माण झाला आहे.
कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता वैष्णोदेवीच्या यात्रेला बसला आहे. त्रिकुटा ...
कसा असणार उड्डाणपूल?
रेल्वे रुळांवरून जाणारा महापालिकेचा हा पहिलाच 'केबल-आधारित' (Cable-Stated Pool) उड्डाणपूल ठरणार आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून, विकास नियोजन आराखड्यानुसार कामाला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. हा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल पश्चिम रेल्वेच्या रुळांवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे. यामुळे सात रस्ता, ताडदेव आणि वरळीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाजवळील गर्दीत न अडकता थेट प्रवास करणे शक्य होईल. पुलाची लांबी एकूण ८०३ मीटर असणार आहे, रुंदी १७.२ मीटर (रेल्वे हद्दीत ही रुंदी २३.०१ मीटर पर्यंत आहे). हा केबल-स्टेड (स्तंभाला जोडलेल्या लोखंडी तारांच्या आधारे पेललेला पूल आहे). तर रेल्वे रुळांवर उभारलेला महापालिकेचा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे जे पर्यावरण पूरक असणार आहे ज्यामुळे झाडाचे संरक्षण होईल. या पुलाच्या बांधकामादरम्यान निसर्गाचाही विचार करण्यात आला आहे. पुलाच्या मार्गात येणाऱ्या वृक्षांची कत्तल टाळण्यासाठी महापालिकेने पुलाच्या मूळ आराखड्यात (Alignment) महत्त्वाचे बदल केले आहेत. "विकासासोबतच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने आम्ही झाडांचे संरक्षण करण्यासाठी पुलाचे संरेखन बदलले आहे," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महालक्ष्मीच्या पुलासाठी ७८.५ मीटरचा अवाढव्य 'पायलॉन' सज्ज...
केबल-स्टेड पुलाच्या रचनेत पायलॉन हा सर्वात कळीचा घटक असतो. या स्तंभावरच पुलाच्या मुख्य भागाला (डेक) आधार देणाऱ्या पोलादी केबल्स ताणल्या जातात. हा स्तंभ जितका मजबूत, तितका पुलाचा टिकाऊपणा अधिक असतो. ७८.५ मीटर ही उंची गाठणे आणि तिथे तांत्रिक स्थिरता राखणे हे पालिकेच्या अभियंत्यांसमोर मोठे आव्हान होते, जे आता प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर यशस्वीरीत्या पेलले जात आहे. या पायलॉनची रचना करताना केवळ वाहतुकीचा भारच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तींचाही विचार करण्यात आला आहे. बांधकामासाठी विशेष ग्रेडचे काँक्रिट आणि अतिमजबूत पोलाद वापरण्यात आले आहे. हा स्तंभ अतिशय वेगवान वारे आणि भूकंपाचे धक्के सहन करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. पुढील अनेक दशकांचा वापर लक्षात घेऊन याची स्थिरता सुनिश्चित करण्यात आली आहे. पायलॉनची उंची प्रचंड असल्याने त्याच्या उभारणीसाठी कार्यस्थळी एक विशेष अत्याधुनिक क्रेन तैनात करण्यात आली आहे. ही क्रेन पायलॉनच्या उंचीपेक्षाही उंच असून, तिच्या साहाय्याने अत्यंत अचूकपणे स्तंभाचे एकेक टप्पे जोडले जात आहेत. पुलाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, आता हा ७८.५ मीटरचा स्तंभ मुंबईच्या आकाशात डौलाने उभा राहत आहे.






