विमानतळांना विमान प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या महसुलातूनच उत्पन्न मिळत होते. विमान थांब्याचे भाडेही उत्पन्नाचे एक साधन होते; परंतु आता वाढीचा पुढील टप्पा अधिक विमानसेवा पुरवण्याने नव्हे, तर अधिक हुशारीने विक्री करण्याने येणार आहे. भारताच्या नवीन विमान वाहतूक अर्थव्यवस्थेत आकाश ही आता मर्यादा राहिलेली नाही. तीच आता एक बाजारपेठ बनली आहे.
प्रा. सुखदेव बखळे
रतातील विमानतळांसाठी सीट अपग्रेड आणि लाउंजसह पूरक उत्पन्न आता नफ्याचे एक प्रमुख साधन बनले आहे. ते विमानतळांना चैतन्यपूर्ण ग्राहक केंद्रांमध्ये रूपांतरित करत आहे आणि हवाई प्रवासाचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहे. आता तुम्ही दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल तीनवर असाल, तर उशीर होण्याचे कारण कदाचित डिपार्चर गेट नसेल, तर नवीन शनेल बुटीक असेल. हैदराबादमध्ये विमानात चढण्यापूर्वी गॉर्डन रॅमसे बर्गर खाण्याचा मोह होऊ शकतो. संपूर्ण भारतात याच पद्धतीने विमानप्रवासाची नव्याने आखणी केली जात आहे. आता विमानप्रवास केवळ गंतव्यस्थानी पोहोचण्यापुरता मर्यादित नाही; तर प्रवासी मधल्या वेळेत तास कसे घालवतात, यालाही महत्त्व आले आहे.
भारताच्या विमान वाहतूक उद्योगासाठी आता आकाशात नाही, तर जमिनीवर सर्वात महत्त्वपूर्ण वाढ होत आहे. नॉन-तिकीट आणि गैर-विमानचालन महसूल प्रवाह हे या क्षेत्राचे सर्वात मजबूत वाढीचे इंजिन बनले. तिकीट विक्रीमुळे प्रवासी येतात; परंतु सीट अपग्रेड, लाउंज, प्रीमियम जेवण, जाहिरात, ब्रँडेड किरकोळ विक्री आणि विशेष अनुभव यांसारख्या अतिरिक्त सेवांमुळे नफ्याचे प्रमाण वाढत आहे. महसूल निर्मितीच्या पद्धतीत ही खेळी एक स्पष्ट बदल दर्शवत आहे. जागतिक स्तरावर विमान वाहतूक उद्योगाच्या नफ्यासाठी पूरक महसूल दीर्घकाळापासून महत्त्वाचा मानला जात आहे. आजघडीला हिथ्रो, चांगी आणि दुबईसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ४० ते ५० टक्के महसूल नॉन-तिकीट स्रोतांमधून येतो. भारतही यात मागे नाही. विमानतळ आणि एअरलाइनच्या उत्पन्नात पूरक सेवांचे योगदान २५ ते ३५ टक्के आहे. उद्योग अंदाजांनुसार, डिजिटायझेशन आणि प्रीमियम अनुभवांची वाढती मागणी या बदलाला गती देत आहे. भारतात हा बदल दोन पातळ्यांवर होत आहे. विविध एअरलाइन्स तिकीट विक्रीपलीकडे जाऊन आपल्या सेवांचे जाळे सर्व्हिस इकोसिस्टीममध्ये रूपांतरीत करत असून विमानतळे रिटेल विक्री, खानपान सेवा आणि मीडिया यांचे हब बनत आहे.
‘एअर इंडिया’मध्ये टाटा समूह करत असलेला कायापालट नवी विमाने आणि नवीन ब्रँडिंगपुरता मर्यादित नाही. ही एअरलाइन कंपनी प्रवाशांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यातून कमाई करण्यासाठी एक मजबूत पूरक सेवा पोर्टफोलिओ तयार करत आहे. पूरक महसूल आर्थिक वर्ष २०२४ मधील १,७०० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. २०२७ पर्यंत ही विमान कंपनी ‘अपग्रेड प्लस,’ ‘सीट अपग्रेड’, अतिरिक्त सामान, भाडे लॉक, प्रवास विमा, गिफ्ट कार्डस आणि ‘व्हीफएस ग्लोबल’च्या ‘वनवास्को व्हिसा कॉन्सियरज’सारख्या सेवांद्वारे हा महसूल तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. प्रवाशांना ‘फ्लाय प्रायर’सारख्या सेवा आवडत आहेत. त्यामुळे जादा शुल्क देऊन त्याच दिवशी फ्लाइट बदलता येते. ‘झिपअहेड’द्वारे प्राधान्य चेक-इन, टॅक्सी बुकिंगसाठी टाय-अप आणि टाटा एआयजी प्रवास विमा यांसारख्या इतर सेवा सोयीचे रूपांतर महसुलात करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. ‘सीट निवडण्यापासून टॅक्सी बुकिंगपर्यंत प्रत्येक उत्पादन, ब्रँडला प्रवाशांच्या निर्णय प्रक्रियेत टिकवून ठेवते’, असे एका एअरलाइन अधिकाऱ्याने सांगितले. ‘इंडिगो’चा मोठ्या प्रमाणावरील फायदा दर्शवतो, की पूरक महसूल वाढ किती दूर जाऊ शकते. सध्या खासगी विमानतळे एअरलाइन्सच्या धोरणाचे अनुकरण करत आहेत. गैर-विमानचालन महसूल आता त्यांच्या व्यवसाय मॉडेलचा केंद्रबिंदू बनला आहे. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे संचालन करणाऱ्या जीएमआर एअरपोर्टसमध्ये गैरविमान वाहतूक (नॉन-एरो) उत्पन्न आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ४३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४७ टक्क्यांपर्यंत वाढले आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढले. किरकोळ विक्री, ड्युटी-फ्री उत्पादनांची विक्री, खाद्य आणि पेय (एफ अँड बी) आणि इतर सेवा या वाढीमध्ये आघाडीवर आहेत.
‘भारताचे विमान वाहतूक क्षेत्र विस्ताराच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना आम्हाला प्रवासी वाढ आणि खर्च या दोन्हीला चालना देणारे मजबूत अनुकूल घटक दिसत आहेत,’ असे ‘जीएमआर एअरपोर्टस’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (वाणिज्य आणि विकास) राजेश अरोरा यांनी सांगितले. आम्ही केवळ पायाभूत सुविधांचे संचालक या भूमिकेतून विकसित होऊन एक वैविध्यपूर्ण ग्राहक मंच बनलो आहोत आणि विमानतळांना मूल्य प्रदान करणाऱ्या गंतव्यस्थानांमध्ये रूपांतरित केले आहे, असे ते म्हणाले. आठ विमानतळांचे संचालन करणाऱ्या ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ने (एएएचएल) आर्थिक वर्ष २०२५ मध्ये गैरविमान वाहतूक महसुलातून चार हजार ९२६ कोटी कमावले. हे उत्पन्न ‘अदानी एअरपोर्टस’च्या एकूण उत्पन्नाच्या जवळपास निम्मे आहे. एप्रिल मून रिटेल आणि मुंबई ट्रॅव्हल रिटेलसारख्या उपकंपन्या विस्तारणाऱ्या इन-हाऊस किरकोळ विक्री मॉडेलला चालना देत आहे. अदानी समूह विविध टप्प्यांमधील शहरस्तरीय प्रकल्पांमध्ये चार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. त्यापैकी जवळपास ७० टक्के रक्कम मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांसाठी राखून ठेवण्यात आली. यामध्ये प्रवासी, कर्मचारी आणि शहरातील ग्राहकांना सेवा देणाऱ्या वैयक्तिकृत, डेटा-आधारित किरकोळ व्यवसायावर भर दिला जात आहे.
‘आम्ही संपूर्ण विमानतळ व्यवसायाचा ताबा घेण्याची आणि सर्व किरकोळ व्यवसाय स्वतःच चालवण्याची योजना आखत आहोत’, असे ‘अदानी एअरपोर्ट’चे सीईओ गौरव सिंग यांनी सांगितले. बंगळूरुचे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणाऱ्या ‘बंगळूरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’साठी महसुलाच्या ३५ टक्के वाटा ‘नॉन-एरो’ व्यवसायातून येतो. त्यात ‘एफ अँड बी’ लाउंज, किरकोळ विक्री, ड्युटी-फ्री उत्पादनांची विक्री आणि जाहिरातींचा समावेश आहे. कंपनी पुढील पाच वर्षांमध्ये आपल्या किरकोळ व्यवसायाचा विस्तार ४० हजार चौरस मीटरवरून एक लाख चौरस मीटरपर्यंत वाढवण्याची आणि ५०० हून अधिक ब्रँड्स जोडण्याची योजना आखत आहे.