मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त करण्यात यावेत, असा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे म्हणाले, ग्रामीण भागात अनेक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ व्यक्ती विविध सामाजिक क्षेत्रांत उत्तम काम करतात. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत महिला आरक्षण किंवा एससी, एसटी आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना निवडणूक लढवता येत नाही. अशा परिस्थितीत, या तज्ज्ञ लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण विकासासाठी व्हावा, या हेतूने त्यांना 'स्वीकृत सदस्य' म्हणून संधी दिली जावी, अशी आग्रही मागणी आहे. महसूलमंत्र्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि ग्रामविकास मंत्र्यांचीही याबाबत चर्चा करण्यात आली असून हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि त्यानंतर विधिमंडळात मंजुरीसाठी येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान,राज्यातील महापौर आरक्षणाच्या सोडती अत्यंत पारदर्शकपणे आणि कॅमेऱ्यांच्या देखरेखीत झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेणे किंवा कलंक लावणे हे त्यांना शोभणारे नाही, असे ते म्हणाले.
युतीबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव, लातूर, परभणी आणि संभाजीनगरमधील काही भागांत भाजप-शिवसेना युती झाली असून, काही ठिकाणी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. गेल्या १० वर्षांत निवडणुका न झाल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे युती करण्याचा भाजपचा प्रामाणिक प्रयत्न असून, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.
एमआयएम'सोबत समझोता नाही
अचलपूर नगरपालिकेच्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या चर्चांवर महसूलमंत्र्यांनी कडक भूमिका मांडली. अचलपूरमध्ये भाजपचे ९ नगरसेवक असून आम्ही तिथे अल्पमतात आहोत. तिथे एमआयएम, काँग्रेस आणि उबाठा गटाने आपले स्वतंत्र गट तयार केले आहेत. भाजप एमआयएमला कधीही सोबत घेणार नाही आणि आमचा त्यांना कोणताही पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले , "बदलापूरात घडलेली घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांबद्दल अशा खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणे खेदजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व मोठे असून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. अशा वेळी विरोधी पक्षांनी टीका करण्याऐजी त्यांचे जाहीर आभार मानायला हवेत. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी आपली वैचारिक पातळी सुधारण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.






