Friday, January 23, 2026

विकास गोगावलेंसह एकूण आठ तर हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

विकास गोगावलेंसह एकूण आठ तर हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाड : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदान केंद्र दोन शाळा क्रमांक पाचच्या बाहेरील रस्त्यावर दोन डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंसह एकूण आठ तर राष्ट्रवादीच्या हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना महाड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. महाड न्यायालयाचे न्यायाधीश यु. एम. जाधव यांनी हा आदेश दिला.

उच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढल्यानंतर दोन्ही बाजूचे आरोपी पोलिसांपुढे शरण आले. सर्व आरोपी महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. याआधी गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही बाजूकडील आरोपी महाड परिसरात आले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास विकास गोगावले आणि अन्य सात जणांनी महाड शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यांना सायंकाळी सहाच्या सुमारास महाड न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. तर राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप आणि अन्य चार जण दुपारनंतर महाड मधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले. या आरोपींना संध्याकाळी सव्वासहा नंतर महाड शहर पोलीस ठाणे त्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. सर्व आरोपींना सुनावणीअंती महाड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली.

नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असताना शाळा क्रमांक पाचच्या बाहेरील मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाभरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास गोगावले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची तक्रार विकास गोगावले यांनी केली होती.

सुशांत जाभरे यांच्या संरक्षकाकडे असलेल्या रिव्हॉल्वर झटापटीवेळी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे विकास गोगावलेंनी सांगितले. या घटनेनंतर थोड्याच वेळात विकास गोगावलेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनात हॉकी स्टिक आणि स्टंप असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तर सुशांत जाभरेंनी त्यांच्या समर्थकाला गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. दोन्ही बाजूचे आरोपी चार डिसेंबर २०२५ पासून महाडबाहेर निघून गेले होते. पोलिसांनी हाणामारी प्रकरणी तपास सुरू केला. पण दोन्ही बाजूचे आरोपी सापडत नव्हते. तपासातील दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यानंतर आरोपी पोलिसांपुढे शरण आले.

Comments
Add Comment