वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १० चाकी ट्रकचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी केलेली तपासमोहीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोणताही थेट धागा हाती नसताना आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत पोलिसांनी चार राज्यांतील हालचाली तपासल्या आणि अवघ्या आठ दिवसांत ट्रकचा ठावठिकाणा लावला.
या तपासादरम्यान पोलिस पथकाने महाराष्ट्राबाहेर जाऊन मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील मार्गांचा मागोवा घेतला. विविध महामार्गांवरील टोलनाक्यांमधील माहिती तसेच शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फूटेज बारकाईनं तपासण्यात आले. माहिती मिळवण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी आपले वेषही बदलले.
तपासातून मिळालेल्या संकेतांच्या आधारे ट्रक मध्यप्रदेशातील अतिदृग्ग्रम भाग असलेल्या अलीयापुर जिल्ह्यातील ग्राम बोरकरा येथून शोधून आणला. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून पुढील तपास सुरू आहे.
दारू विक्री संदर्भात कठोर पाऊले
दरम्यान, जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतुकीवरही पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. पुलगाव उपविभागात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वर्धा पोलिसांच्या या दोन्ही कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तंत्रज्ञान आणि नियोजनाचा प्रभावी वापर कसा केला जाऊ शकतो, याचं उदाहरण समोर आलं आहे.






